○ महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने केली कारवाई
सोलापूर : स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सोलापूर महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने विविध प्रकारचे 11 नियम न पळल्याने दि.1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या वर्षभराच्या कालावधीत एकूण 4 हजार 360 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. Solapur: Punitive action against 2212 people for not segregating garbage, Lagushanka Municipal Corporation त्यांच्याकडून एकूण 17 लाख 25 हजार 450 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, कोविड अंतर्गत दंड, स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत दंड आणि सामान फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फी, कमान फी असे एकूण 53 लाख 90 हजार 122 रुपये म्हणजेच अर्धा कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात विविध प्रकारची दंडात्मक कारवाई आणि फी वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून आरोग्य निरीक्षकांमार्फत ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. विविध प्रकारचे 11 स्वच्छतेचे नियम न पाळल्याने महापालिका प्रशासनाकडून नियमित ही कारवाई करण्यात येते. या अंतर्गत सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध प्रकारचे 11 नियम न पाळल्याने एकूण 4 हजार 360 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून 17 लाख 25 हजार 450 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सामान फी, मांडव फी, डिजिटल बोर्ड फी आदी पाच प्रकारची फी आकारणी पोटी एकूण 3 हजार 539 पावत्या करत एकूण 36 लाख 26 हजार 492 रुपये फी जमा झाली आहे. तर कोविड अंतर्गत केलेल्या कारवाईपोटी 32 जणांविरुद्ध कारवाई केली असून 38 हजार 180 रुपये दंड आकारण्यात आला आहे. असे तीन प्रकारच्या दंड व फी आकारणी पोटी एकूण 7 हजार 932 पावत्या करण्यात आल्या असून 53 लाख 90 हजार 122 रुपये भरणा महापालिका तिजोरीत झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ प्लास्टिक व थर्माकोल प्रकरणी 8.34 लाख रुपये दंड वसूल
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्लास्टिक व थर्माकोल प्रकरणी 283 जणांविरुद्ध कारवाई केली असून त्यांच्याकडून 8 लाख 34 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सी अँड डी वेस्ट (अजोरा) रस्त्यावर टाकल्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध कारवाई करून 15 हजार रुपये दंड केला आहे, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली.
○ कचरा विलगीकरण न करणाऱ्या 2212 जणांविरुद्ध कारवाई !
कचरा विलगीकरण न केल्याने 2 हजार 212 जणांविरुद्ध कारवाई करत त्यांच्याकडून 4 लाख 67 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून घाण करणे बाबत 1 हजार 340 जणांवर कारवाई केली असून 2 लाख 1 हजार 150 रुपये दंड वसूल केला आहे. बायोमेडिकल वेस्ट संदर्भात 17 जणांकडून 85 हजार रुपये दंड जमा केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने 212 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 21 हजार 200 रुपये दंड वसूल केला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणे व विलगीकरण न करणे याबाबत 23 जणांना विरुद्ध कारवाई केली त्यांच्याकडून 69 हजार रुपये दंड वसूल केला आहे.
○ सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या 259 जणांविरुद्ध कारवाई !
सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याबाबत 2 जणांवर कारवाई करत एक हजार रुपये दंड आकारला आहे. सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या 259 जणांविरुद्ध कारवाई करत 26 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी शौच करणाऱ्या चार जणांवर कारवाई करून दोन हजार रुपये दंड केला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली असून 2 हजार 500 रुपये त्यांच्याकडून दंड घेण्यात आला आहे.
दरम्यान, कोरोना काळात सन 2022 मध्ये सुरुवातीला 32 जणांविरुद्ध नियम मोडल्या प्रकरणी कारवाई करत 38 हजार 180 रुपये दंड वसूल केला आहे. मास्क न वापरणे यासह विविध प्रकारची ही कारवाई करण्यात आली आहे.
○ सामान, मांडव, डिजिटल बोर्ड फी पोटी 36.26 लाख रुपये जमा
गत वर्षभरात सामान फी, मांडव फी व डिजिटल बोर्ड फीच्या माध्यमातून 3 हजार 529 एकूण पावत्या करण्यात आल्या. त्यापोटी 36 लाख 26 हजार 492 जमा झाले आहेत. शहरात महापालिकेच्या रस्त्यावर वाळू, दगड, विटा माती आदी बांधकाम साहित्य ठेवल्याने सामान फी अंतर्गत 2 हजार 251 जणांकडून 25 लाख 13 हजार 839 रुपये फी आकारण्यात आली आहे. विविध कार्यक्रमासाठी रस्त्यावर मांडव टाकल्याने महापालिका फी आकारते. त्या मांडव फी पोटी 1 हजार 036 पावत्या करत 8 लाख 83 हजार 399 रुपये फी घेण्यात आली आहे. कमान फी पोटी 111 पावत्या करत 91 हजार 422 रुपये जमा करण्यात आले आहेत. शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या डिजिटल बोर्ड फी पोटी 129 पावत्या करण्यात आल्या असून एकूण 1 लाख 27 हजार 582 रुपये जमा झाले आहेत.
तसेच मंडपासाठी करण्यात आलेल्या खड्डा फी पोटी 12 जणांकडून 10 हजार 250 रुपये फी घेण्यात आली आहे.
○ नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई : उपायुक्त घोलप
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत विविध प्रकारचे 11 नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येते. शहर स्वच्छ व सुंदर ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वच्छता राखण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वच्छतेचे नियम पाळावे, असे आवाहन महापालिका उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांनी केले आहे.