बार्शी : पैसे व मिनी गंठण चोरल्याचे सासूस माहीत झाल्याच्या कारणावरून सासूचा गळा आवळून डोक्यात जखम करून खून करणाऱ्या व पडून जखमी होऊन मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या सुनेवर बार्शी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. Solapur. The daughter-in-law killed the mother-in-law by strangulation, because if you read it, you will be shocked Barshi Bagle Chaal
सोलापूर रोड येथील बगले चाळ येथे दि. ८ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ चे दरम्यान ही घटना घडली होती. निर्मला महादेव धनवे (वय ५५ रा. बगले चाळ, सोलापूर रोड, बार्शी) असे मयत सासूचे नाव आहे. कोमल अनिल धनवे (वय २१ रा. बगले चाळ, बार्शी) असे खुनाचा गुन्हा दाखल झालेल्या संशयित सुनेचे नाव आहे. फौजदार गजानन कर्ने वाड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
दि. ८ रोजी रात्री ७.४५ सुमारास येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये एक महिला मयत अवस्थेत दाखल झाल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यास प्राप्त झाली होती. त्यानुसार फौजदार कर्नेवाड व पोलिसांनी तेथे जाऊन मयत महिलेची पाहणी केली असता मयताच्या डोक्यात मध्यभागी व कपाळावर उजव्या बाजूस जखम झालेली तसेच मानेवर खरचटलेले व्रण दिसले.पंचनामा करून त्यांनी शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. त्यानंतर त्यांनी मयत महिलेच्या घरी जाऊन पंचनामा केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी तेथे मयत महिलेचा मुलगा अनिल व त्याची पत्नी कोमल हे उपस्थित होते. घरातील खोलीत मध्यभागी फरशीवर व दाराजवळ रक्त सांडलेले दिसत होते. रक्तामध्ये लोखंडी सांडशी पडलेली होती. याच सांडशीने मयत निर्मला हिने स्वतःच्या डोक्यात मारून घेतल्याचे कोमल हिने पोलिसांना सांगितले. याबाबत पोलिसांनी अनिलकडे चौकशी केली असता त्याने, आई निर्मला व पत्नी कोमल यांच्यात घरगुती कारणावरून नेहमी वाद होत होते. याच कारणाने सहा महिन्यापूर्वी पत्नीस माहेरी सोडल्याचे व नंतर तिने माफी मागितल्यानंतर दोन महिन्यापूर्वी तिला घेऊन आल्याचे सांगितले.
आईच्या खोलीत एक लाकडी पेटी होती. त्या पेटीत आईने मिनी गंठण व भाऊ खंडू याने काम करून दिलेले सात हजार रुपये ठेवले होते. एके दिवशी खंडूने पेटी उघडून पाहिले असता त्यात पैसे व मिनी गंठण दिसले नाही म्हणून आई पत्नी कोमल हिच्यावर संशय घेत होती. अनिलने पत्नीस विश्वासात घेऊन विचारले असता, एका बाईकडून व्याजाने सोळा हजार रुपये घेऊन आले आहे, असे कोमलने सांगितले. त्यावरून मयत निर्मला यांनी पैसे व मिनी गंठण कोमल हिनेच चोरून नेलें आहे; म्हणून दोघींचे आठ दिवसापासून भांडण सुरू होते.
दि. ८ रोजी अनिल हे कामावर असताना सायंकाळी ६.३० च्या सुमारास त्यांना पत्नी कोमलने फोन केला. आत्या खाली फरशीवर पडली आहे व त्यांच्या डोक्यातून रक्त येत आहे. तुम्ही लवकर या असे सांगितल्याने ते घरी आले. त्यावेळी आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसले. उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले.
दरम्यान, डोक्यात जखम झाल्याने तसेच गळा आवळल्याने निर्मला यांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यावरून पैसे व मिनी गंठण चोरल्याचे सासूस माहीत झाल्याच्या कारणावरून घरात कोणी नसताना कोमलनेच निर्मला यांचा गळा आवळून व डोक्यात जखम करून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी कोमलवर खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार करत आहेत.