आयपीएल अर्थात इंडियन प्रिमियर लीग ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. भव्यदिव्य आयोजन, रंगारंग स्वरूप, प्रचंड खर्च, अमाप लोकप्रियता, अफाट गर्दी इत्यादी कारणांमुळे पहिल्या सिझनपासून संपूर्ण जगाला मोहिनी घातलेल्या या इंडियन प्रिमियर लीगला दुसर्या भाषेत इंडियन पैसा लीग असे म्हटले जाते. Indian Premier League, Indian Paisa League: Complete IPL Kundli Player Auction Exclusively For ‘Surajya’ Readers या लीगमुळे अनेक खेळाडू उदयास आले आणि झटपट श्रीमंतही झाले. अनेक गुणी व मौल्यवान खेळाडू या लीगमुळे जागतिक क्रिकेट विश्वाला मिळाले. अशी लीग जगामध्ये इतर देशांमध्येही खेळली जाते. मात्र इंडियन क्रिकेट लीग अर्थात आयपीएलने जे जगात स्थान मिळवले आहे; ते अन्य कोणत्याही क्रिकेट लीगला मिळाले नाही. सध्या आयपीएलचा सोळावा सिझन चालू आहे. संपूर्ण देश आपीएलमय झाला आहे. या पार्श्वभूमीवर आयपीएलची संपूर्ण कुंडली खास ‘सुराज्य’च्या वाचकांसाठी ‘संडे मॉर्निंग’ या सदरातून देत आहोत.
इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) ची स्थापना 2007 मध्ये झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसच्या मदतीने करण्यात आली होती. आयसीएलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) द्वारे मान्यता मिळाली नाही. म्हणून खेळाडूंना आयसीएलमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी, बीसीसीआयने त्यांच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये बक्षिसाची रक्कम वाढवली आणि आयसीएलमध्ये सहभागी होणार्या खेळाडूंवर आजीवन बंदी घातली. अर्थात आयसीएलला बोर्डाने बंडखोर लीग असे संबोधले होते.
○ इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)
सन 2007 मध्ये भारताने टी 20 विश्वचषक आपल्या नावावर केला. त्यानंतर दि.13 सप्टेंबर 2007 रोजी बीसीसीआयने इंडियन प्रिमियर लीग नावाच्या फ्रँचायजी-आधारित ट्वेंटी20 क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली. पहिला सिझन एप्रिल 2008 मध्ये नवी दिल्ली येथे एका भव्यदिव्य समारंभात केला.
आयपीएलचे नेतृत्व करणारे बीसीसीआयचे उपाध्यक्ष ललित मोदी यांनी स्पर्धेचे स्वरूप, बक्षिसाची रक्कम, फ्रँचायजी पध्दत आणि संघ रचना, नियमांसह स्पर्धेचा तपशील सांगितला. भारताचे माजी खेळाडू आणि बीसीसीआय अधिकार्यांचा समावेश असलेल्या सात सदस्यांची गव्हर्निंग कौन्सिलद्वारे आयपीएल चालवणार होती.सुरुवातीला बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद, राजस्थान, कोलकाता, पंजाब आणि मुंबई संघांचा यामध्ये समावेश होता.
○ आयपीएल सामने
आयपीएलमध्ये विविध राज्यांमध्ये टी-20 चे क्रिकेट सामने खेळवले जातात. यामध्ये भारतीय खेळाडूंबरोबरच इतर देशातील खेळाडूंचा समावेश असतो. या क्रिकेट लीगमध्ये भाग घेणारे खेळाडू ज्या राज्याच्या अथवा शहराच्या संघात खेळतात, ते खेळाडू त्या राज्याचे अथवा शहराचे प्रतिनिधित्व करतात. या लीगच्या शेवटी जो संघ विजयी होतो, त्याला आयपीएल ट्रॉफी व बक्षीस दिले जाते.
○ आयपीएल मॅच फॉरमॅट
आयपीएलमध्ये भाग घेणार्या प्रत्येक टीमला दुसर्या संघासोबत दोन सामने खेळावे लागतात आणि त्यामध्ये ‘टॉप चार’ मध्ये येणारे संघ ‘प्लेऑफ’साठी क्वालिफाय होतात. प्लेऑफमधील दोन संघामध्ये फायनलसाठी सामने खेळले जातात. यामध्ये विजयी होणारा संघ फायनलमध्ये प्रवेश करतो. हरलेल्या संघाला फायनलमध्ये आपली जागा बनवण्यासाठी पुन्हा एक संधी दिली जाते आणि हा संघ दुसरा क्वालिफायर तिसर्या व चौथ्या नंबरच्या संघातील जिंकलेल्या संघाशी खेळतो. या दुसर्या क्वालिफायरमधील विजयी संघ फायनललमध्ये प्रवेश करतो.
○ खेळाडू घेण्याची पध्दत
कोणत्याही टीमची फ्रँचायजी तीन प्रकारे खेळाडू घेतात. पहिला प्रकार आहे लिलावाचा. लिलावात बोली लावून खेळाडू घेता येतात. दुसरा ट्रेडिंग विंडोचा आहे. यामध्ये एक संघाला दुसर्या संघासोबत खेळाडू एक्स्चेंज करता येतात. तिसरा प्रकार अनुपलब्ध खेळाडूंसाठी प्रतिस्थापनेवर दुसरे खेळाडू घेणे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ खेळाडूंचे वाटप
लिलावातील खेळाडूंना इंडियन कॅप्ड, इंडियन अनकॅप्ड आणि परदेशी खेळाडू अशा तीन श्रेणीमध्ये विभागला जाते. या खेळाडूंना नंतर गोलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज, अष्टपैलू आणि यष्टिरक्षक अशा त्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे वेगवेगळ्या लॉटमध्ये ठेवले जाते. ज्या खेळाडूने आत्तापर्यंत आपल्या देशासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही त्याला अनकॅप्ड म्हणतात.
○ आयपीएल लिलाव
आयपीएल लिलावादरम्यान, लिलावकर्ता खेळाडूच्या नावाची घोषणा करतो. त्यानंतर संघ त्या खेळाडूच्या आधारभूत किमतीनुसार बोली लावतात. समजा एखाद्या खेळाडूची मूळ किंमत 1 किंवा 2 कोटी रुपये असेल तर त्या खेळाडूची पहिली बोली 1 किंवा 2 कोटी रुपयांपासून सुरू होते. यानंतर, इतर संघांच्या बोलीमुळे त्या खेळाडूची किंमत वाढते. कोणताही संघ खेळाडूच्या आधारभूत किमतीवर खेळाडू खरेदी करू शकतो. खेळाडूसाठी सर्वाधिक बोली लावल्यानंतर, लिलावकर्ता सर्व संघांना खेळाडूवर लावलेल्या शेवटच्या बोलीबद्दल तीन वेळा सूचित करून आणि कोणत्याही संघाने स्वारस्य न दाखविल्यास त्याची विक्री करून लिलाव प्रक्रिया पूर्ण करतो. जो संघ सर्वाधिक किंवा शेवटची बोली लावतो तो खेळाडू विकत घेतो आणि त्याच्या संघात सामील होतो.
○ खेळाडूंची आधारभूत किंमत
लिलावापूर्वी खेळाडू आधारभूत किंमत ठरवतो आणि ती बीसीसीआयला सादर करतो. कॅप्ड भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडू, सर्वसाधारणपणे, त्यांची मूळ किंमत जास्त ठेवतात, कारण त्यांना लिलावात जास्त किंमत मिळण्याची अपेक्षा असते. दुसरीकडे, अनकॅप्ड आणि कमी प्रसिद्ध खेळाडू त्यांच्या मूळ किमती तुलनेने कमी ठेवतात. आधारभूत किंमत ठरवताना खेळाडू त्यांची मागील कामगिरी, त्यांची लोकप्रियता, सोशल मीडिया फॉलोअर्स इत्यादी गोष्टी विचारात घेतात.
○ खेळाडू रिटेन करणे
कोणतीही फ्रँचायजी लिलाव सुरू होण्याआधी आपल्या संघाचे जास्तीत जास्त तीन खेळाडू आपल्या संघात राखून ठेवू शकते. यामुळे लिलावा दरम्यान रिटेन केलेल्या खेळाडूंची बोली लागत नाही.
आपल्या टीममधील महत्त्वाचे खेळाडू आपल्या टीममध्येच रहावे, यासाठी रिटेनचा वापर केला जातो. पण त्या खेळाडूला रिटेन करायचा की नाही हे त्या फ्रँचायजीवर अवलंबून असते.रिटेन केलेल्या खेळाडूच्या किमतीएवढी रक्कम लिलावासाठी निश्चित केलेल्या रकमेतून कमी होते.
○ राईट टू मॅच म्हणजे काय ?
’राईट टू मॅच’चा अधिकार फ्रँचायजीला असतो. या अधिकारांतर्गत कोणतीही फ्रँचायजी आपल्या टीमच्या विकलेल्या खेळाडूंना पुन्हा परत घेऊ शकते. जर एखादी फ्रँचायजी आपल्या एखाद्या खेळाडूला रिटेन करत नाही आणि त्या खेळाडूला दुसरी फ्रँचायजी विकत घेते, तेव्हा ती फ्रँचायजी आपल्या विकलेल्या खेळाडूला परत मिळवण्यासाठी लिलावाची प्रक्रिया संपल्यावर ’राईट टू मॅच कार्ड’चा वापर करू शकते. जेवढ्या किमतीला त्याला दुसर्या फ्रँचायजीने विकत घेतलेले असते तेवढीच किंमत त्याला द्यावी लागते.
○ ऑरेंज कॅप व पर्पल कॅप
आयपीएलच्या प्रत्येक सिझनमध्ये सर्वात जास्त धावा काढणार्या खेळाडूला ऑरेंज कॅप तर सर्वात जास्त बळी घेणार्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. आयपीएल संपल्यावर संबंधित खेळाडूकडेच ती कॅप राहते.
○ भरपूर कमाई
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आयपीएलचे संचालन करते आणि या दोघांच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत मीडिया आणि प्रसारण आहे. आयपीएल फ्रँचायजी त्यांचे मीडिया हक्क आणि प्रसारण हक्क विकून जास्तीत जास्त पैसे कमवतात. सुरुवातीला बीसीसीआय प्रसारण अधिकारातून मिळणार्या कमाईपैकी 20 टक्के रक्कम ठेवत असे आणि 80 टक्के रक्कम संघांना मिळत असे. पण हळूहळू हा वाटा 50-50 टक्क्यांपर्यंत वाढला.
○ जाहिरातबाजीतून पैसा
आयपीएल मीडिया ब्रॉडकास्टचे हक्क विकण्यासोबतच फ्रँचायजी जाहिरातींमधूनही भरपूर पैसे कमावतात. खेळाडूंच्या टोप्या, जर्सी आणि हेल्मेटवर दिसणार्या कंपन्यांची नावे आणि लोगोसाठी कंपन्या फ्रँचायजींना खूप पैसे देतात. आयपीएल दरम्यान, फ्रँचायजींचे खेळाडू अनेक प्रकारचे जाहिराती शूट करतात. यातून कमाईही केली जाते. एकूणच, जाहिरातीमुळे आयपीएल संघांनाही भरपूर पैसा मिळतो.
○ तीन प्रकारे कमाई
आयपीएल संघांची कमाई तीन भागांमध्ये विभागली गेली आहे, केंद्रीय महसूल, प्रमोशनल महसूल आणि स्थानिक महसूल. माध्यम प्रसारण हक्क आणि शीर्षक प्रायोजकत्व फक्त केंद्रीय महसुलात येतात. संघांची सुमारे 60 ते 70 टक्के कमाई यातून येते. दुसरे म्हणजे जाहिरात आणि जाहिरातींचे उत्पन्न. यातून संघांना 20 ते 30 टक्के उत्पन्न मिळते. त्याचवेळी, संघांच्या कमाईच्या 10 टक्के स्थानिक महसुलातून येतात.
यामध्ये तिकीट विक्री आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. प्रत्येक हंगामात 7-8 घरगुती सामन्यांसह, फ्रँचायजी मालक अंदाजे 80 टक्के कमाई तिकीट विक्रीतून ठेवतो. उर्वरित 20 टक्के बीसीसीआय आणि प्रायोजकांमध्ये विभागले गेले आहेत. तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे संघाच्या कमाईच्या 10-15 टक्के असते. संघ जर्सी, कॅप्स आणि इतर ऍक्सेसरीज सारख्या व्यापारी मालाची विक्री करून कमाईचा एक छोटासा भाग देखील तयार करतात.
○ आयपीएल आणि सट्टेबाजी
ज्या प्रकार खेळाडू आणि फ्रँचायजी आयपीएलमधून सरळ सरळ पैसे कमवतात; त्याचपध्दतीने दुसर्या बाजूला आयपीएलवर सट्टा लावून अनेक सट्टेबाज पैसे कमवतात. या सट्टेबाजांची मजल इतकी दूरपर्यंत गेली आहे की ते थेट मॅचच फिक्स करू लागले आहेत. असे प्रकार यापूर्वीही उघडकीस आले आहेत. त्यामुळे सट्टेबाजी हा क्रिकेटला लागलेला कलंक आहे.
सट्टेबाजीमध्ये बुकीकडे पहिल्यांदा विशिष्ट रक्कम जमा करून त्यानंतर प्रत्येक बॉलनुसार सट्टा लावला जातो. हा सट्टा लाखांच्या घरात असतो. पुढे काय होणार आहे हे ओळखून पैसे लावले जातात. जसे अपेक्षीत असते तसे नाही घडले तर पैसे जातात. सुदैवाने तसेच घडले तरच पैसे मिळतात. सट्टा कायद्याने गुन्हा असल्यामुळे हा प्रकार अत्यंत गोपनीय पध्दतीने चालतो. ज्या ज्यावेळी सट्टा लावणार्यांवर धाडी पडल्या; त्या त्या वेळी लाखो रुपयांची उलाढाल असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जसा आयपीएलमधून पैसा कमवला जातो, तसा सट्टाबाजारातूनही पैसा कमवला जातो.
○ आयपीएल ट्रॉफीवर संस्कृत श्लोक
आयपीएल ट्रॉफीचा रंग सोनेरी असून ती सोने आणि हिर्यापासून बनवलेली असते; असे सांगितले जाते. या ट्रॉफीवर ‘यत्र प्रतिभा अवसरा प्राप्नोतिही’ असा संस्कृत श्लोक लिहिलेला असतो. या श्लोकातून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला गेला आहे. ‘प्रतिभा आणि संधी यांचा संगम’ असा या श्लोकाचा मराठी अर्थ असून आयपीएलशी हा श्लोक सुसंगत झालेला आहे. याशिवाय ट्रॉफीवर आतापर्यंत विजेतेपदे पटकावलेल्या सर्व संघांची नावेसुध्दा लिहिलेली आहेत.
✍️ ✍️ ✍️
• ॲड. राजकुमार नरुटे
संकलन आणि संपादन