सोलापूर/ विशेष प्रतिनिधी
अमेरिकेतल्या हिंडेनबर्गने जगाच्या पाठीवरील सर्वात श्रीमंतांपैकी एक असणाऱ्या गौतम अदानी या भारतीय उद्योगपतीने अफरातफरी केल्याचा गौप्यस्फोट केला आणि संपूर्ण देश हादरला. कारण भारतात अदानी आणि मोदी या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हाच मुद्दा उचलून धरला आणि त्यातच संसदेचे संपूर्ण अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळून गेले. Raised Delhi; Raised Maharashtra; UP was saved, Karnataka went astray; Adani’s discussion ended with Modi Shah politics to the point यावर काहीच उत्तर देता न आल्यामुळे झालेली नाचक्की आणि देशाच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेली नको तितकी चर्चा थांबवण्यासाठी सीबीआयची चौकशी लावून राजधानी दिल्लीला चर्चेतून उठवले. राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते अजित पवार यांच्या कथित भाजप प्रवेशाच्या चर्चेने संपूर्ण महाराष्ट्रालाच उचकवले. अतिक व अहमदच्या खूनकांडाने संपूर्ण यूपीतील अदानी चर्चेलाच सटकवले. राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आयाराम-गयारामच्या गदारोळात कर्नाटकाला भटकवले. या संपूर्ण घडामोडींमधून अदानीच्या विषयाला बरोबर संपवण्यात भाजपवाले यशस्वी झाल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावरच हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयतेच हत्यार मिळाले. ‘भारत जोडो’ यात्रेतील अभूतपूर्व प्रतिसादामुळे फुल्लफॉर्ममध्ये असलेले राहुल गांधी
यांनी तोच मुद्दा उचलला आणि अदानीमित्र पंतप्रधान मोदींवर शरसंधान सुरू केले. संपूर्ण अधिवेशनात सत्ताधारी भाजपच्या तोंडून अदानीमधला अ सुध्दा निघाला नाही. संपूर्ण अधिवेशन अदानीच्या मुद्याभोवतीच फिरले आणि शेवटी नाइलाजास्तव गुंडाळले. त्यानंतर संपूर्ण देशात अदानीचा विषय सुरू झाला. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी अदानीवरून मोदींना टार्गेट केले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने तर राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकारला उघडे पाडण्याचा कार्यक्रमच सुरू केला. या पार्श्वभूमीवर भाजपची होणारी नाचक्की थांबवण्यासाठी आणि देशाचे अदानीवरील लक्ष हटवण्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रम आखला गेला आणि त्यात केंद्र सरकारला यश आले. दिल्लीसह उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील अदानीपुराण तूर्त तरी बंद पाडण्यात केंद्र सरकार यशस्वी ठरले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ केजरीवालांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा
हिंडेनबर्गनंतर राहुल गांधी यांच्यासोबतच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अदानीवरून थेट मोदींना प्रश्न विचारला. त्यानंतर लगेचच त्यांच्या मागे सीबीआयचा ससेमिरा लागला. ज्या प्रकरणात केजरीवालांची चौकशी सुरू झाली ते प्रकरण जुने. त्यात काहींना अटक होऊन तपासाने अंतिम टप्पा गाठलेला आहे. तरीही तपासाचा भाग असल्याचे पुढे करून केजरीवालांचे तोंडचे पाणी पळवले. साहजिकच दिल्लीत सुरू असलेली अदानींची चर्चा केजरीवालांच्या चौकशीकडे वळली.
○ अजित पवारांच्या बंडाची वावटळ
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे फडणवीस सरकार विरोधात गेला, – आणि त्यात शिंदे गटाचे १५-२० आमदार अपात्र ठरले तरी सरकार पडणार नाही. तरीही सरकार कोसळणार आणि अजित पवार बंड करून भाजपमध्ये जाणार; त्यातून भाजप सरकार तरणार अशा चर्चेची सापसुरळी राष्ट्रवादीच्या पायात सोडली.
या दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ही अफवा असल्याचे सांगत होते. मात्र भाजपवाले बंडाला उत्तेजन देणारी विधाने करत होते. त्यामुळे महाराष्ट्रात अजित पवारांच्या बंडाशिवाय दुसऱ्या कोणत्याच विषयाची चर्चा झाली नाही.
○ निवडणुकीशिवाय कर्नाटकात दुसरी चर्चाच नाही
कर्नाटकात भाजप अडचणीत असल्याचे मतदानपूर्व चाचण्यांमध्ये दिसून आले. त्यात अदानीचा मुद्दा निवडणुकीसाठी अडचणीचा ठरू लागला. अशावेळी अदानीच्या मुद्याला बगल देण्यासाठी कर्नाटकात धक्कातंत्राचा अवलंब केला. त्यातून आयाराम- गयारामांचीच चर्चा सुरू झाली. यांचा तिकडे प्रवेश आणि त्यांचा इकडे प्रवेश याशिवाय कर्नाटकात चर्चेला दुसरा विषयच ठेवला नाही. त्यातून अदानींची अदा कुठे परागंदा झाली, हे कन्नडिगांना कळलेच नाही. साहजिकच अदानी हा कर्नाटकातील निवडणुकीचा विषय उरलाच नाही.
○ अतिक-अहमदसोबत अदानीच्या चर्चेचा एन्काऊंटर
उत्तर प्रदेशात गँगस्टर अतिक व अहमद यांच्या खूनकांडावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्याठिकाणी बहुमताच्या जोरावर अतिक- अहमदचा मुडदा पाडताना अदानीच्या चर्चेचाही एन्काऊंटर करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशच्या गल्लीबोळात सध्या अतिक-अहमद आणि योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय चर्चेसाठी दुसरा मुद्दाच उरला नाही. अतिकचा मुलगा असदचा एन्काऊंटर झाल्यानंतर दोनच दिवसात अतिक-अहमदला यमसदनी धाडल्यामुळे अदानीपेक्षा आदित्यनाथ हाच यूपीतील चर्चेचा विषय बनला आहे.