अक्कलकोट : दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथी निमित्त पालखी सोहळा मिरवणूक मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने संपन्न झाला. हजारो भक्तगणांच्या सहभागाने या पालखी सोहळ्यात स्वामी भक्तीचा सुगंध वाहून स्वामींचा पालखी सोहळा रंगला होता. तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने सायंकाळी साडे पाच वाजता मंदिरातून पालखी मिरवणुकीस भक्तीभावाने प्रारंभ झाला. Shri Swami’s Palkhi ceremony of Rangala Swami with participation of thousands of devotees Solapur Akkalkot
प्रारंभी चोळप्पा महाराजांचे वंशज देवस्थानचे पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांचे हस्ते श्रींची आरती झाली. यानंतर वटवृक्ष मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते पालखी पूजन होऊन प्रस्थान झाले.
पालखी सोहळ्यामध्ये टाळ मृदूंगाचा गजर, सुश्राव्य बँड पथक, दिंडी, व स्वामी नामाचा गजर, तसेच ढाकणी, चिकुर्डा, खामसवाडी, उदतपूर, तावशी, उस्मानाबाद, येथून आलेल्या वारकरी दिंडया, ढोल पथक, नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी यामुळे पालखी सोहळा रंगला होता. याच बरोबर संपूर्ण मंदिरास नयनरम्य अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
पालखी सोहळ्याचे चौकाचौकात भाविकांनी रांगोळी व गुलाबपुष्पांच्या उधळणासह स्वागत करून दर्शन घेतले. फत्तेसिंह चौक, समर्थ चौक, सावरकर चौक, कारंजा चौक मार्गे समाधी मठाकडे पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. समाधी मठात पालखीचे पूजन, भजन होऊन कारंजा चौकमार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिरात पालखी विसावली.
वटवृक्ष मंदिरात भजन, विडा, चौरी, आरती होऊन शिरा प्रसाद वाटपाने पालखी सोहळ्याची सांगता झाली. स्वामी पुण्यतिथी निमित्त आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अमोलराजे भोसले, आदी विविध मान्यवरांनी श्रींचे दर्शन घेतले. पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त अक्कलकोट नगरीत दाखल झाले होते.
यावेळी देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, दयानंद हिरेमठ, प्रदीप झपके, विजय दास, श्रीशैल गवंडी, प्रसन्न हत्ते, नागनाथ जेऊरे, प्रमोद हिंडोळे, राजेश नीलवणी, व्यंकट मोरे, अमर पाटील, रामचंद्र समाणे, शिवानंद स्वामी, प्रदीप हिंडोळे, राजेंद्र हत्ते, प्रसाद काळे, पिंटू साठे, चंद्रकांत सोनटक्के, दीपक जरीपटके, शिवशरण अचलेर, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, संजय पाठक, गिरीश पवार, शशिकांत लिंबीतोटे, अजिंक्य डांगे, चंद्रकांत डांगे, श्रीनाथ महानुरे, अक्षय सरदेशमुख, काशिनाथ गुरव, ज्ञानेश्वर भोसले, संतोष जमगे, श्रीनिवास इंगळे आदीसह देवस्थानचे व अन्नछत्र मंडळाचे कर्मचारी व सेवेकरी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 अक्कलकोटनिवासी श्री स्वामींच्या पुण्यतिथी सोहळ्यास हजारो स्वामी भक्तांची उपस्थिती
अक्कलकोट : दिगंबरा दिगंबरा…. श्रीपाद वल्लभ दिगंबरा….! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय…च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४५ व्या श्रींच्या पुण्यतिथी सोहळा भक्तिभावाने साजरा झाला. Shri Swami’s death anniversary: Batavriksha Devasthan… Palkhi ceremony of Rangala Swami with participation of thousands of devotees Solapur Akkalkot
न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी (ता.१८ ) पहाटे रथोत्सव, विधीवत पूजा, धार्मिक कार्यक्रम, पारायण, महाप्रसाद, रक्तदान, व जिम्नॅशियमचा १५ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या भेटी व सत्कार आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अन्नछत्र मंडळात हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतले. न्यासाने केलेल्या नेटक्या नियोजनाने भक्तातून समाधान व्यक्त करण्यात आले असून, अन्नछत्र मंडळात भक्तीचा मळा फुलला..!
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या ३५ वर्षापासून श्रींची पुण्यतिथी साजरी केली जाते. या बरोबरच नगर प्रदक्षिणेच्या शेवटच्या सात दिवस रथ सप्ताह असतो, यामध्ये न्यासाच्या रथाचा सहभाग असतो.
पहाटे श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पूजनानंतर अमोलराजे भोसले यांच्या हस्ते रथाचे पूजन करुन बुधवार पेठेतील समाधी मठाकडे मार्गस्थ करण्यात आले. महाप्रसादालयात सकाळी स्वामींचे पारायण संपन्न झाले. दुपारी ११.३० च्या दरम्यान श्री व अन्नपूर्णा, महाप्रसादाचे पूजन आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी गृह राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व मराठी अभिनेता विलास चव्हाण पुणे, डॉ.प्रसाद प्रधान ठाणे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष विनायक म्हशीलकर यांच्यासह स्वामी भक्तांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अन्नछत्र मंडळातील नैवेद्य श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, बुधवार पेठेतील समाधी मठात श्रींना दाखविण्यात आले. यावेळी स्वामीभक्त बहुसंख्येने उपस्थित होते. यानंतर महाप्रसादालयात न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या मंत्र पठणाने महाआरती संपन्न झाली व आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या हस्ते संकल्प सोडण्यात आल्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला.
पुण्यतिथी निमित्त अन्नछत्र मंडळातील परिसरातील रक्तपेढी आयोजित रक्तदान शिबीरात १७५ स्वामीभक्तांनी रक्तदान केले. न्यासाने स्वामीभक्त व शहरवासियांच्या सोयीकरिता इन व आऊट डोअर व्यायाम शाळा उपलब्ध करुन दिलेली आहे.
यापैकी इनडोअर असलेल्या मातोश्री श्रीमंत कांतामती विजयसिंहराजे भोसले जिम्नॅशियम सेंटरच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री हनुमान मूर्तीचे पूजन झाले.
स्वामी भक्तांमुळे झालेल्या गर्दीमुळे अन्नछत्र परिसर फुलून गेलेला होता. स्वामी भक्तांना महाप्रसादाबाबत स्वत: अमोलराजे भोसले हे पंक्तीत फिरुन आस्थेने चौकशी करीत होते.
स्वामी भक्तांनी अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या श्री शमी-विघ्नेह गणेश मंदिर, ब्रह्मांडनायक उभी स्वामींची मूर्ती, नियोजित महाप्रसादगृह इमारत, सध्याचे अद्यावत तात्पुरते महाप्रसादालय, कपिला गाय, कारंजा, शिवस्मारक, कार्यरत यात्री निवास -१ , यात्रीभुवन-२ , अतिथी गृह, आऊटडोअर व इनडोअर जीम, प्रशस्त वाहनतळ, टेकडीवरील श्री समर्थ वाटिका, शिवचरित्र प्रदर्शन हॉल, अग्निशमन, रुग्णवाहिका, आश्रयदाते कक्ष हे सर्व न्यासाने भक्तांच्या सेवेर्थ सुरु केलेल्या विविध उपक्रमांचे स्वागत करुन न्यासाचे कौतुक केले. परगावच्या आलेल्या पालख्यांचे स्वागत न्यासाच्या वतीने करण्यात आले.
महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंद्रप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, केरळ, गुजरात, उत्तराखंड, दिल्ली व जम्मू काश्मीर पंडीत, राजस्थान, उत्तरप्रदेश वाराणसी यासह देश व विदेशातील स्वामी भक्तांनी तीर्थक्षेत्री श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात येऊन हजारो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.