○ राजकारणी आणि उद्योगपतीच्या मैत्रीला अर्थकारणाची जोड
सध्या संपूर्ण देशात अत्यंत तापलेला विषय म्हणजे हिंडेनबर्ग आणि हिंडेनबर्गने केलेल्या दाव्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येकाच्या टीकेचे धनी बनलेले जगातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले भारतीय उद्योगपती गौतम अदानी. याच गौतम अदानींमुळे यंदाचे संसदेचे पावसाळी अधिवेशन जवळजवळ वाया गेले. The Industry of Politics; Industry Politics Helicopter Diplomacy Sharad Pawar Gautam Adani Maruti Car Videocon Dhoot
सभागृह चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधार्यांची असते. मात्र जेव्हा विरोधकांनी अदानींचा विषय आणला; तेव्हा सभागृह चालू नये म्हणून गोंधळ घालण्याची वेळ सत्ताधार्यांवर आली. कारण सत्ताधार्यांना विरोधकांच्या प्रश्नाचे उत्तर देता येत नव्हते. ज्या अदानींमुळे देशाची संसद बंद पाडली जाते; ते अदानी सत्ताधार्यांना एवढे जवळचे का आहेत? उद्योगपती राजकीय पक्षांना जवळ का करतात? किंवा राजकीय पक्षांना उद्योगपती आपल्या जवळ असावेत असे का वाटते? या प्रश्नाचे उत्तर शोधताना राजकारणाचे उद्योग आणि उद्योगाचे राजकारण या अनुषंगाने राजकारणी आणि उद्योजक यांच्यातील संबंधांवर प्रकाश टाकणारा संडे स्पेशलचा खास वृत्तांत फक्त ‘सुराज्य’च्या वाचकांसाठी.
सत्ता कोणत्याही पक्षाची असो, सत्ताधारी पक्षाच्या ढेपेला उद्योगपतींचे मुंगळे चिकटलेले पाहायला मिळतात. राज्यकर्ते आणि उद्योगपती यांचे मैत्रीपूर्ण संबंध हमखास असतातच. किंबहुना सत्ताधारी आणि उद्योगपती हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. सत्ताधारी म्हटले की सत्ताधारी पक्षाच्या आजूबाजूला घोंगावणार्या उद्योजगपतींचे टाळके असतेच. दुसर्या शब्दात सांगायचे झाले तर उद्योगपती हे सत्ताधारी पक्षाशी मैत्री करण्यासाठी आसूसलेले असतातच. या दोघांना एकमेकांकडे खेचणारी अर्थशक्ती ही याठिकाणी चुंबकासारखी काम करत असते. दोघांनाही आर्थिक हव्यास असतो.
सत्ताधार्यांना सत्ताकारण करण्यासाठी आणि उद्योगपतींना त्यांचे अर्थकारण करण्यासाठी एकमेकांची आवश्यकता असते. त्यातूनच जिथे सत्ताधारी; तिथे उद्योगपती आणि जिथे उद्योगपती तिथे राजकारणी हे भारतीय लोकशाहीत सार्वकालिक सत्य होऊन बसले आहे.
○ मतांसाठी पैसा अन् उद्योगांसाठी सवलत
राजकारणी आणि उद्योगपती यांच्या मैत्रीला अर्थकारणाची जोड असते. राजकारण्यांना निवडणुका लढवाव्या लागतात, निवडणुका जिंकून सत्ता मिळवायची असते. निवडणुका जिंकण्यासाठी पैसा लागतो. हा पैसा उद्योगपती विविध माध्यमातून राजकीय पक्षांना पुरवत असतात. कारण उद्योगपतींना उद्योगधंदा करायचा असतो. त्यासाठी सरकारकडून विविध सवलती हव्या असतात. ह्या सवलती सत्ताधारी पक्षातील राजकारणी मिळवून देत असतात. त्या पदरात पाडून घेण्यासाठी उद्योगपती राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसा पुरवत असतात. याला कोणताच पक्ष अपवाद नाही. आजचा विरोधी पक्ष उद्या सत्ताधारी होतो; तेव्हा हेच उद्योगपती त्यांना जाऊन चिकटतात. त्यामुळे राजकारणी आणि उद्योगपती यांचे संबंध परस्पर पूरक असणे, ही खास बाब नव्हे तर सामान्य बाब झाली आहे.
○ कर्जबुडव्यांना राजकारण्यांचाच आशीर्वाद
अलीकडच्या काळात अनेक उद्योगपतींनी अनेक बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून परदेशात पलायन केले. त्यामुळे भारतातील विविध बँकांना गंडा बसला. म्हणजे भारतीय नागरिकांच्या पैशांवर या पळपुट्या उद्योगपतींना डल्ला मारला. कारण बहुसंख्यवेळा सत्ताधार्यांनी नियमात बसत नसतानाही नियमांची तोडफोड करून आणि कागदी घोडे नाचवून उद्योगपतींना कर्ज दिलेले असते. हा आडमार्गाने मिळवलेला अर्थपुरवठा पचला तर उत्तम. नाही पचला तर त्याच सत्ताधारी राजकारण्यांच्या मदतीने कोणालाही न माहिती होता हे उद्योगपती आपल्या लवाजम्यासह परदेशात पळून जातात. त्यानंतर सुरू होतो तो नुसत्या वेळकाढू चौकशीचा फार्स. त्यातून अनेकवेळा काहीच हाती लागत नाही. नुकसान होते ते भारतीय नागरिकांचे.
○ सर्व राजकीय पक्ष सारखेच
स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांचे पुत्र स्व. संजय गांधी यांना स्वत:ची कार कंपनी सुरू करायची होती. सध्याची मारुती कार कंपनीची स्थापना ही संजय गांधी यांनीच केलेली. ते स्वत: मारुती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी त्यावेळी देशातील आणि देशाबाहेरील उद्योगपतींना शेअर्स घेण्यास भाग पाडले होते. त्यावरून टीकाही झाली होती. संजय गांधीचे स्वप्न पूर्णत्वाकडे निघाले होते. त्यादरम्यानच त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मारुतीची कार बाजारात आली. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत मारुती कंपनीमध्ये गांधी परिवाराचा हक्क होता. मात्र सांगायचा मुद्दा हा की इंदिरा गांधी यांनीसुध्दा उद्योगपतींना जवळ करूनच मुलाचे स्वप्न पूर्ण केले होते.
○ पळसाला पाने तीनच
शिवसेना हा मराठी माणसांच्या हक्कासाठी स्थापन झालेला पक्ष आहे. परंतु शिवसेनेनेसुद्धा व्हिडिओकॉन उद्योगाचे सर्वेसर्वा राजकुमार धूत यांना राज्यसभेवर पाठवले. राहुल बजाज राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेले एकमेव अपक्ष उमेदवार असावेत. त्यांना त्यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखाने पाठिंबा दिला होता.
उत्तर प्रदेशच्या राजकारणात मध्यस्थ म्हणून प्रसिध्द असणारे माजी खा. अमरसिंग समाजवादी पार्टीचे माजी अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांच्या जवळचे होते. उद्योगपती अनिल अंबानी व त्यांची घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळेच अनिल अंबानी यांची 2003 मध्ये उत्तरप्रदेश डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती. शिवाय त्यांना 2004 मध्ये समाजवादी पार्टीकडून राज्यसभेवरही पाठविण्यात आले होते. सध्या परदेशात पळून गेलेले विजय मल्ल्या यांना 2002 मध्ये कॉंग्रेसने आणि 2010 मध्ये भाजपने राज्यसभेचे खासदार बनवले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● रिक्षाचालक ते उद्योगपती
पुण्यातील सध्याचे आघाडीचे उद्योगपती अविनाश भोसले हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे. ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा रिक्षा चालवत होते. त्यांनी छोटीछोटी बांधकाम कंत्राटे घेत घेत त्यांनी 1979 मध्ये एबीआयएल (अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड) ग्रुपची स्थापना केली. त्यातून ते महाराष्ट्र सरकारच्या अनेक मुख्य पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही उतरले. महामार्ग, पूल, बोगदे, तलाव आणि धरणे बांधू लागले. मात्र 1995 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना त्यांनी मोठी भरारी घेतली. कृष्णा खोरे विकास महामंडळाची असंख्य कामे त्यावेळी त्यांना मिळाली. पुढे दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडी सरकारलाही ते युती सरकार इतकेच प्रिय होते. त्यांच्या भरभराटीला ‘रॉकेट राईज’ असे म्हटले जाते.
○ सर्वपक्षीय प्रिय व्यक्तिमत्त्व
अविनाश भोसले यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेलच्या उद्घाटनाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, पतंगराव कदम आणि त्यावेळेचे देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे जातीने हजर होते. बाळासाहेब ठाकरे महाबळेश्वरला गेल्यानंतर ते अविनाश भोसले यांच्या बंगल्यामध्ये राहत होते.
बाळासाहेब ठाकरे पुण्यात आल्यानंतर अनेकदा त्यांच्या गाडीचे सारथ्य अविनाश भोसले यांनीच केले आहे. कॉंग्रेसचे मोठे नेते विश्वजित कदम हे त्यांचे जावई आहेत. भोसले यांचा मातोश्रीपासून बारामतीपर्यंत चौफेर सगळीकडे मुक्त वावर आहे. 1997 पासून महाराष्ट्रातील सर्वच सत्ताधार्यांना हवे हवे असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अविनाश भोसले होय.
○ हेलिकॉप्टर डिप्लोमसी
अविनाश भोसले यांच्याकडे तीन हेलिकॉप्टर आहेत. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी आपल्या प्रचारासाठी भोसलेंचे हेलिकॉप्टर वापरतात. राजकारण्यांना हेलिकॉप्टर पुरवणे हा अविनाश भोसले यांचा छंद असल्याचे सांगितले जाते. उद्धव ठाकरे यांनी आषाढी वारीच्या फोटोग्राफीसाठी अविनाश भोसले यांचेच हेलिकॉप्टर वापरले होते. याचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी ’पाहावा विठ्ठल’ या त्यांच्या पुस्तकामध्ये केला आहे.
महाराष्ट्राशिवाय देशातील अन्य राजकारण्यांनाही भोसले यांनी हेलिकॉप्टरसेवा पुरवली आहे. अविनाश भोसलेंचे हेलिकॉप्टर न वापरले नाही असा बडा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. अनेक केंद्रीय नेत्यांनीही भोसलेंच्या हेलिकॉप्टरचा उपभोग घेतला आहे.
○ उद्योगपतीच्या हाती राज्याच्या राजकारणाची सूत्रे
मूळचे सांगलीचे असणारे कन्हैयालाल गिडवाणी लहान वयात सांगलीच्या गल्ली बोळात फिरून सायकलवर अडकवलेल्या पिशवीतील गोळ्या बिस्किटे विकणारे. पुढे ते साखरेच्या धंद्यातील मोठे व्यापारी झाले आणि तेच व्यापारी म्हणून राजकारणात गेले. त्याठिकाणी राज्याच्या राजकारणाची सूत्रे स्वत:च्या हाती ठेवण्याइतपत त्यांनी राजकारणात स्वत:चे प्रस्थ प्रस्थापित केले. वसंतदादा पाटील यांनी सांगलीत सहकारी साखर कारखाना उभारला. त्यावेळी बाजारपेठेत साखर व्यापार्यांची मक्तेदारी होती. ती मोडून काढण्यासाठी वसंतदादांनी गिडवाणी यांना पुढे आणले.
दादांनीच त्यांना मुंबईला आणले. दादा आणि शंकरराव चव्हाण यांचे संबंध बिघडल्यानंतर दादांच्या बाजूने उघडपणे फिरणारे गिडवाणीच होते. दादांचा 70 वा वाढदिवस सांगलीला धूमधडाक्यात करण्याचे नियोजन करणारेही गिडवाणीच होते. तेव्हा नागपूरला विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते. कॉंग्रेसचे मंत्री आणि आमदार यांनी सांगलीला जाऊ नये, यासाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी हरप्रकारे प्रयत्न केले. कन्हैयालाल गिडवाणी यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाकावर टिच्चून दादा समर्थक आमदारांना खास चार्टर्ड विमानाने नागपूरवरून सांगलीला आणले आणि रातोरात परत नेऊन सोडले.
○ हेगडे सरकार पाडण्याची जबाबदारी गिडवाणींवर
पुढे दादा मुख्यमंत्री झाले. या काळात विशेषतः शालिनीताई पाटलांशी कन्हैयालाल गिडवाणी यांचे सूर जुळले. कर्नाटकात रामकृष्ण हेगडे यांचे सरकार पाडायचा विडा उचलून शालिनीताई बेंगलोरला गेल्या होत्या. तेव्हा त्यांना रसद गिडवाणी यांनीच पुरवली होती. गिडवाणी तिथल्या हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगेसह पोलिसांना सापडले होते. पण या सर्व प्रकरणातून गिडवाणी सहीसलामत बाहेर पडले.
○ राष्ट्रीय राजकारणातही प्रवेश
वसंतदादांच्या मृत्यूनंतर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात जनता दलाची साथ पकडली. नासिकराव तिरपुडे यांच्यासारख्या नेत्याला कॉंग्रेसमधून जनता पक्षात नेण्यात त्यांचाच हात होता. लवकरच पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांच्या निकटवर्तीयांसोबत ते दिसू लागले. व्ही.पी. सिंग यांचं सरकार पडल्यावर चंद्रशेखर यांच्या पक्षात गेले. पडद्याआड राहून प्यादे हलवणे यात त्यांनी स्पेशलायजेशन मिळवले.
○ युती सरकारच्या निर्मितीत गिडवाणींची करामत
सन 1995 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आले. एका बाजूला मुख्यमंत्री शरद पवारांना म्हणजे कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. दुसर्या बाजूला शिवसेना- भाजपलाही सत्ता स्थापन करण्यासाठी संख्याबळ कमी पडत होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी गिडवाणींचा पत्ता बाहेर काढला. गिडवाणी यांनीही त्यांचे कौशल्य पणाला लावून अपक्ष आमदारांना शिवसेनेच्या पाठीशी उभे केले.
सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या निर्मितीत गिडवाणी किंगमेकर ठरले होते. म्हणून बाळासाहेबांनी त्यांना शिवसेनेत घेऊन विधानपरिषदेवर आमदार केेले. त्यावेळी विधानसभेत लातूरमधून पराभूत झालेले विलासराव देशमुख यांना शिवसेनेत आणण्याची जबाबदारीसुध्दा गिडवाणी यांनीच पार पाडली होती.
○ भाजी विक्रेता ते उद्योजक आणि उद्योजक ते खासदार
महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पावधीत लोकप्रिय झालेला चेहरा म्हणजे संजय काकडे. संजय काकडे 2014 मध्ये राज्यसभेवर बिनविरोध खासदार झाले. राज्यसभेच्या इतिहासात नोंद झालेली ही घटना आहे. कोणत्याही पक्षाचा सदस्य नसलेली आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेली व्यक्ती बिनविरोध निवडून जाण्याची ती पहिलीच वेळ होती. राज्यसभेवर गेल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनानंतर संजय काकडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला. ते भाजपाचे सहयोगी सदस्य देखील झाले.
घोरपडी पेठेत हालाखीच्या परिस्थितीत माजी खासदार काकडे यांचे बालपण गेले. एका शिक्षकाच्या घरात जन्म घेतलेल्या संजय काकडे यांनी 1986 मध्ये बांधकाम व्यवसायात पाऊल टाकले आणि ‘संजय काकडे ग्रुप’ची मुहूर्तमेढ रोवली गेली. रिअल इस्टेट व इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारा विश्वसनीय ब्रँड म्हणून आज ‘संजय काकडे ग्रुप’ची ओळख आहे. येणार्या नजीकच्या काळात भूगाव येथे 150 एकरमध्ये टाऊनशीप, कोंढवा परिसरात 250 एकरामध्ये टाऊनशीप, कोथरुडला 25 एकरमध्ये काकडे सिटी, बाणेर रस्त्यावर कमर्शिअल प्रोजेक्ट, कोरेगाव पार्कमध्ये पंचतारांकित हॉटेल इत्यादी अनेक प्रकल्प होत आहेत.
○ ठाकरे कुटुंबीय आणि धूत
औरंगाबादमधून येणार्या नंदलाल धूत यांनी व्हिडिओकॉनची स्थापना केली. तेव्हापासूनच ठाकरे कुटुंबीय आणि धूत कुटुंबीय यांचे जवळचे संबंध असल्याचं सांगितलं जात. वेणूगोपाल धूत यांचा औरंगाबाद इथे एक प्रशस्त बंगला आहे. या बंगल्याचा अनेक राजकारणी, उद्योगपती वापर करत असतात. याच बंगल्यात औरंगाबादला आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेही यायचे.
वेणूगोपाल धूत यांचे भाऊ आणि व्हिडिओकॉनचे सहमालक राजकुमार धूत हे शिवसेनेकडून तीन वेळा राज्यसभेचे खासदार होते. धूत हे 2002 ते 2020 या 18 वर्षांच्या काळात शिवसेनेकडून तीन टर्म खासदार होते. व्हिडिओकॉन ही कंपनी शिवसेनेची सर्वात मोठी देणगीदार आहे. 2015-16 मध्ये शिवसेनेला मिळालेल्या एकूण 86.84 कोटी रुपयांच्या देणग्यांपैकी एकट्या व्हिडिओकॉनने 85 कोटी रुपयांची देणगी दिली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली.
✍️ ✍️ ✍️