● पोहण्याचा आनंद क्षणिक ठरला, दोघा मित्रांवर काळाचा घाला
सोलापूर : सोलापूर – तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून अंत झाला. खोल पाण्यात बुडताना दोघा मित्रांनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. शेवटी दोघां मित्रांनी एकमेकांना मिठी मारत अखेरचा श्वास घेतला. After drowning in the Hipparga lake, the two friends hug each other as they see death. Unmarried Solapur
हिप्परगा तलावात तब्बल २४ तासानंतर दोघांचा मृतदेह एकमेकांना कवटाळलेल्या अवस्थेत तलावाच्या पाण्यावर तरंगताना आढळला. सोलापुरातील दोन तरुणांनी सार्वजनिक जीवनात आपली दोस्ती कायम ठेवली होती. पोहण्याचा आनंद क्षणिक ठरला. मृत्यू दिसताच आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही या मित्रांनी एकमेकांना कवेत घेतले. तलावाभोवती जमलेल्यांना हा दोस्ताना पाहून गहिवरून आले होते.
नागेश रमेश बोलू (वय २६) आणि राज सुरेश गवळी (वय २१ दोघे रा. सग्गमनगर, मुळेगावरोड, विडी घरकुल) अशी मयत झालेल्या मित्रांची नावे आहेत. रविवारी (ता.२१ ) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नागेश व त्याचा मित्र राज आणि अन्य दोघे असे चौघेजण लग्नातील जेवण करून हिप्परगा तलावात पोहण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने नागेश आणि राज गटांगळ्या खाऊ लागले. त्यावेळी त्याच्या दोघा साथीदारांनी आरडा ओरड केली. तलावात पोहणाऱ्या अन्य लोकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते दोघे एकमेकांना मिठी मारीत पाण्यात बुडाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ही घटना समजल्यानंतर तलाव परिसरातील नावाडी, सोलापूर तालुक्याचे पोलीस कर्मचारी यांनी सायंकाळपर्यंत पाण्यात दोघांचा शोध घेतला. मात्र त्यांचे मृतदेह आढळले नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी पुन्हा पोलीस, नावाडी आणि अग्निशामकच्या पथकाने अथक परिश्रम घेतले. मात्र त्यांना यश आले नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले व ते शासकीय रुग्णालयात पाठवले. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. ही वार्ता समजताच विडी घरकुल परिसरात शोककळा पसरली.
● दोघेही अविवाहित
मयत नागेश बोल्लू हा अविवाहित असून याच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परिवार आहे. तो एका कॉम्प्युटरच्या दुकानात कामाला होता. तर त्याचा मित्र राज सुरेश गवळी हा देखील अविवाहित असून त्याच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. तो सिद्धेश्वर मार्केटयार्ड येथे माथाडी काम करीत होता. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून तपास फौजदार जाधव करीत आहेत.
● फायर ब्रिगेडचीही मदत
हिप्परगा तलावात दोघेजण बुडाल्याची खबर रविवारी मिळाल्यानंतर अग्निशामक दलाची टीम तिकडे रवाना झाली. सायंकाळपर्यंत शोध घेतला पण ते दोघे तरुण सापडले नाहीत. ही टीम सोमवारी सात वाजता पुन्हा गेली. दोघांचे प्रेत फुगून वर आले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोरी लावून प्रेत बाहेर काढले व पोलिसांच्या ताब्यात दिले, असे दलाचे प्रमुख केदार आवटे यांनी सुराज्यशी बोलताना सांगितले.