○ कारखान्याचे गेट तोडून जवळपास 300 जणांना घेतले ताब्यात
● ‘फौज’ तयार, ‘हातोडा’ पडणार चिमणी ‘मान’ टाकणार ?
सोलापूर : सोलापूरच्या विमानसेवेत अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला आजपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. Heavy police deployment at Sri Siddheshwar Sugar Factory, Solapur workers tensed, hundreds detained, Airline Chimney demolition तसेच एक किलोमीटर परिघात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास तीनशेहून अधिक कामगार आणि सभासदांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
साखर कारखाना परिसरात काल पासून जमावबंदीचा निर्णय जाहीर होताच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. कारखान्याची चिमणी पाडकामास सुरुवात झाल्याचे समजून अनेकजण जमा झाले. कामगार, कारखाना प्रतिनिधीसह माकपच्या कार्यकर्त्याची संख्या वाढू लागली. रात्री दीड- दोनपर्यत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी पहाटे कारखान्याचे मोठे लोखंडी गेट तोडून अनेकांची धरपकड केली. कारखाना प्रतिनिधीने पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या सोलापूरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी पाडण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. महापालिकेने पाडकामासंदर्भात आज बुधवारपासून कारवाई सुरू करत असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे तर दुसरीकडे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
कारखाना परिसरात कलम १४४ लागू करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनाही पाचारण करण्यात आले आहे. दुसरीकडे कारखान्यानेही याला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे बुधवारपासून पुढील काही दिवस शहरातील वातावरण तंग राहणार आहे.
चिमणी पाडकामासंदर्भात सोलापूर महापालिका प्रशासनाने २७ एप्रिल रोजी कारखान्याची चिमणी स्वतःहून पाडून घेण्यासाठी ४५ दिवसांची दिलेली मुदत ११ जून रोजी समाप्त झाली आहे. पण कारखान्याने स्वतःहून चिमणी पाडली नाही. या उलट कारखाना स्थळावर शेकडो सभासद शेतकरी जमवत प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता महापालिका आणि पोलीस प्रशासनानेही कडक भूमिका घेतली आहे.
महापालिकेने सिध्देश्वर कारखान्याच्या प्रशासकांना नोटीस बजावली आहे. पाडकामाची कार्यवाही बुधवारपासून सुरू करत असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे. स्वतः कारखान्याचे ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी ही नोटीस प्राप्त झाल्याची माहिती दिली.
● माकपच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
विमानाच्या नावाने राजकारण करून सिद्धेश्वर साखर कारखाना बंद पाडून शेतकरी कामगारांना उद्धवस्त करू करण्याऱ्या महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ माकप अग्रेसर असून चिमणी ही विमान सेवेत अडथळा ठरते असा जावईशोध येथल्या तज्ज्ञांनी लावला असा आरोप करत या आधी सोलापूर मध्ये किंगफिशर कंपनी मार्फत विमान सेवा उपलब्ध होती. नियमितपणे चालणारी सेवा का बंद पडली? हा यक्ष प्रश्न आहे. आजही मंत्री लोकप्रतिनिधी याची विमाने उतरत असताना चिमणी तेव्हा चिमणी अडसर वाटत नाही हा गौडबंगाल आहे. चिमणी पाडण्याची भूमिका ही शेतकरी कामगारांच्या विरोधात असून जमावबंदी आदेशाचा भंग करून शेतकरी कामगारांसाठी माकप रस्त्यावर उतरला आहे, अशी भूमिका माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांनी व्यक्त केली.
जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख व कॉ.युसूफ शेख मेजर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
माकप चे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन बैठक पार पडली. त्यानंतर माकप चे जिल्हा सचिव अँड.एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार रात्रभर कार्यकर्ते जागरण करून सकाळी पोलिसांना चकवा देत लाल झेंडे घेऊन पालिका व पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढला. यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. रस्त्यावर ठिय्या मांडताच पोलिसांनी बळाचा वापर करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एम. एच शेख, युसुफ मेजर शेख, व्यंकटेश कोंगारी, अँड. अनिल वासम, विल्यम ससाणे, बापु साबळे, विक्रम कलबुर्गी, हसन शेख, दाऊद शेख, नरेश दुगाने, मुरलीधर सुंचू आदींसह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.
● कारखाना परिसरात १४४ लागू
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिघात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या एक किलोमीटरच्या परिघात अत्यावश्यक सेवा वगळता संचार करण्यास बंदी असणार आहे. कारखान्याच्या एक किलोमीटर परिसरात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, बार, हॉटेल धार्मिक स्थळ, प्रार्थना स्थळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. पुढील आदेशापर्यंत कलम १४४ लागू राहणार आहे. सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी हे आदेश जारी केले आहेत.
● कारखान्याकडे जाणारे मार्ग हत्तुरे वस्तीपासून बंद
पोलीस प्रशासनाने सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणारे मार्ग हत्तुरे वस्तीपासून बंद केले आहेत. १३ जून ते १८ जून या सहा दिवस हत्तुरे वस्तीपासून पुढे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे कोणालाही जाता येणार नाही. मंगळवारी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू करण्यात आला आहे. काही ठराविक वाहने आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतरांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. कारखाना ते कुंभारी हाही मार्ग बंद राहणार आहे. आयुक्त राजेंद्र माने यांनी मंगळवारी हा आदेश काढला.
● आजूबाजूच्या गावातही एसआरपीच्या तुकड्या तैनात
कारखान्याच्या कामगारांचा आणि सभासदांचा चिमणी पाडकामास तीव्र विरोध होत असून त्यांनी देखील चिमणीला हात लावून दाखवाच असा पवित्रा घेतल्याने पुन्हा एकदा वातावरण तापलेले आहे. मागील वेळी झालेला गोंधळ पाहता आणि एकूणच संवेदनशील परिस्थिती पाहता आता महापालिका आणि पोलीस प्रशासनाने आता संपूर्ण तयारीनिशी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एसआरपीच्या अर्थात राज्य राखीव दलाच्या तुकड्या कारखाना परिसरासह आजूबाजूच्या गावात तैनात करण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही क्षणी कारखाना परिसर तसेच आजूबाजूच्या गावात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाऊ शकतो, अशी परिस्थिती आहे.
● काय आहे चिमणीचा वाद ?
सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची ही को जनरेशन प्लांटची चिमणी आहे. २०१४ साली कारखान्याने ही चिमणी उभारलेली असून साधारण ९० मीटर इतकी उंची आहे. चिमणीच्या या उंचीमुळे शेजारी असलेल्या सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करता येऊ शकत नाही असा अहवाल डीजीसीएने दिला होता.. सोलापूरला विमानसेवा गरजेची असल्याने ही चिमणी हटवण्याची मागणी सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंच या संघटनानी केली होती. त्यातच सोलापूर महानगरपालिकेने चिमणी अनधिकृत असल्याचे ठरविले. कारवाईच्या हालचाली सुरु केल्या.
● अडथळ्याचे फेरसर्व्हेक्षण सुरु : धर्मराज काडादी
डीजेसीएने त्यांचा यापूर्वीचा स्वत:चा निर्णय बदलून विमानसेवेतील अडथळ्यांचे फेरसर्व्हेक्षण नुकतेच सुरु केले आहे. हे सर्व्हेक्षण सूरु असताना चिमणीवर कारवाई करणे, योग्य ठरणार नाही. प्रशासनाने पाडकामाची घाई करु नये, असे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांनी म्हटले आहे. दरम्यान चिमणीच्या कारवाईला विरोध करताना शेतकरी सभासदांनी अतताईपणा करु नये, कायदा हातात न घेता शांततेने आणि संयमाने विरोध करावा, असे आवाहन काडादी यांनी केले आहे.