सोलापूर : सोलापूरमधील भाजपच्या पाच माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. हे पाचही नेते तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजपाचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र, माजी नगरसेवक नागेश वल्याळ तसेच संतोष भोसले, राजश्री चव्हाण व जुगनबाई आंबेवाले यांनी राजीनामे दिले आहेत.
भाजपामधील ‘मालकशाही’ ला वैतागलेल्या भाजपाचे पाच माजी नगरसेवक आणि एका व्यापारी सेलच्या अध्यक्षांनी भाजपाच्या सदस्यत्वाचे राजिनामे दिले आहेत. या सर्वांची वाटचाल बीआरएसच्या दिशेने असल्याचे बोलले जात आहे. पूर्व भागातील पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्यासह या माजी नगरसेवकांचा बीआरएसमध्ये जाहीर प्रवेश होण्याची शक्यता आहे. बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर या पाच नगरसेवकांची उपस्थिती बीआरएस प्रवेशाचे संकेत मिळाले होते.
बीआरएसचे सर्वेसर्वा तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन विठ्ठलाचा धावा केला होता. त्यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी मनी निवडणुकीचा भाव ठेऊन पूर्वभागातील दिग्गजांच्या भेटीचे नियोजन केले होते. माजी खा. धर्मण्णा सादूल, भाजपाचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निवासस्थानी जाऊन या नेते मंडळीनी बंद खोलीत चर्चा केली होती. सोलापूरच्या विकासासाठी बीआरएस पक्षात येण्याचे आमंत्रण दिले होते.
आगामी निवडणगुकीच्या तोंडावर भाजपातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर येत आहे. भाजपातील मालकशाही आणि एकाधिकार शाहीला अनेक पदाधिकारी, नगरसेवक वैतागले आहेत. भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी असाच आरोप करत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
आता गेली पाच टर्म नगरसेवक असलेले तसेच सभागृह नेते व विरोधीपक्ष नेते पद भोगलेले आणि भाजपा माझी आई आहे, असे सांगणारे सुरेश पाटील यांच्यासह नागेश वल्याळ, संतोष भोसले, राजश्री चव्हाण, जुगनबाई अंबेवाले आणि भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष जयंत होले-पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचे राजिनामे दिले आहेत. हे सर्वजण लवकरच बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पूर्व भागात पकड असणारे दशरथ गोप यांना बीआरएसची ऑफर मिळाल्यानंतर त्यांनी हैद्राबादला जाऊन मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली होती. त्यानुसार शनिवारी ९ जुलै रोजी गोप यांचा जाहीर प्रवेश होणार आहे. त्यावेळी या भाजपच्या नगरसेवकांचाही प्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षापासून माझ्यावर अन्याय झाला पक्षातील मालकशाहीला सर्व जण वैतागले आहेत. आता सोलापूरचा विकास डोळ्यासमोर ठेऊन राजकीय वाटचाल केली जाणार आहे. आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. बैठकीत पुढील राजकीय वाटचाल ठरवू.
– नागेश वल्याळ (माजी नगरसेवक भाजपा)