मुंबई : अजित पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी सर्व 9 मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतल्याचे कळते आहे. Take care of Vitthal for us: All 9 ministers took Sharad Pawar’s blessings, reactions from both Jayant Patil Prafull Patel Ajit Pawar शरद पवारांना वाय.बी.सेंटरवर या नेत्यांनी भेटीसाठी आग्रह केला होता. यावेळी छगन भुजबळ पवारांच्या समोर आले आणि विठ्ठला सांभाळून घे रे आम्हाला, असं म्हणत थेट पवारांच्या पाया पडले. सर्व नेत्यांनी पवारांच्या पाया पडत हात जोडले, अशी माहिती मिळाली आहे.
पावसाळी अधिवेशन सुरु होण्यापूर्वीच अजित पवार राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित मंत्र्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्यासोबत शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आणि मंत्रिपदाची शपथ घेणारे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांचा आश्रय या मंत्र्यांना मिळणार का आणि समजोता होणार का? याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे.
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या भेटीला जाण्यापूर्वी देवगिरी बंगल्यावर बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार सर्व मंत्र्यांना घेऊन वाय बी चव्हाण सेंटरला दाखल झाले आहेत. या सर्व मंत्र्यांना शरद पवाराचा आशिर्वाद मिळणार का याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी अजित पवारांसह सर्व मंत्री शरद पवारांना भेटायला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, प्रफुल पटेल, संजय बनसोडे, आणि दिलीप वळसे-पाटील हे सर्व नेते उपस्थित आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
विरोधकांच्या बैठकीमध्ये सहभागी झालेले जयंत पाटील हे देखील बैठक सोडून वाय बी चव्हाण सेंटरच्या दिशेने रवाना झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी फोन करताच जयंत पाटील हे तातडीने वाय बी चव्हाण सेंटरकडे निघाले आहेत. जयंत पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड हे देखील आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी मंत्र्यांना आक्रमक न होण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी भाष्य केलंय. शरद पवार हे त्यांचे नेते आहेत. त्यामुळे ते सर्व नेते त्यांना भेटायला गेले असावेत, यात काही विशेष नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरून आता नवीन राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्याकडे आलो होतो. राष्ट्रवादीने एकसंध राहावे, अशी विनंती आम्ही शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही असे प्रफुल्ल पटेल ( नेते, अजित पवार गट) यांनी म्हटलंय.
बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान या सर्व नेत्यांनी झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच या चर्चा करुन मार्ग काढण्याची विनंतीही या सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर चर्चा करुन आम्ही भूमिका स्पष्ट करू असे जयंत पाटील (प्रदेशाध्यक्ष, शरद पवार गट) यांनी म्हटले.
दरम्यान, अजित पवारांसोबत असलेल्या आमदार निलेश लंके यांचे पवार परिवाराशी असलेली जवळीक, सर्वश्रुत आहे. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात झाला. लंके यांनी शरद पवार यांच्या “सिल्वर ओक” या पुस्तकाच्या प्रती विद्यार्थ्यांना भेट दिल्या. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक भेट देण्यात आले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजित पवार गटात आहे.
● शरद पवारसाहेबच आमचे प्रेरणास्थान; केबिनमध्ये साहेबांचा फोटो – अजित पवार
नाशिक येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झाले आहेत. येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोठे विधान केले. शरद पवारसाहेबच आमचे प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहेत. माझ्या केबिनमध्ये मी पवारसाहेबांचा फोटो लावला आहे, असेही ते म्हणाले. तसेच सिल्व्हर ओकवर गेलो होतो तेव्हा तिथे पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे होत्या, असेही ते म्हणाले.
● रोहित पवारांचे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न
आमदार रोहित पवार यांचे पुण्यामधील हडपसर परिसरात सृजन हाऊस या ठिकाणचे जनसंपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला आहे. अज्ञात आरोपी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या या कार्यालयात शनिवारी रात्री अज्ञात तीन व्यक्तींनी प्रवेश करत कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ केली. ही घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे.
घडलेल्या प्रकारानंतर रोहित पवार यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आमदार रोहित पवारांच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये असलेली एक सायकल आणि कार्यालयाची काही प्रमाणात जाळपोळ देखील झाली.
सायकलला ऑइल पेंटच्या साह्याने आग लावण्यात आली आहे. शेजारीच असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरात तीन व्यक्ती येताना दिसत आहेत. या व्यक्ती कोण आहे त्यांचा नेमका हेतू काय आणि त्यांनी कशामुळे आग लावण्याचा प्रयत्न केला याची उत्तरे सध्या तरी अनुत्तरित आहेत. हडपसर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.