ठाणे, 9 जुलै, (हिं.स.) भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसेच स्टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा कमी झाला आहे.
दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पाणीपुरवठा कमी होत असल्याने महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरण्यात समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील तीन दिवस (०९, १० आणि ११ जुलै, २०२४) अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी. तसेच पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.