□ उच्च शिक्षण घेण्यामध्ये मुलांपेक्षा मुली आघाडीवर
सोलापूर – भारतामध्ये कधी काळी महिलांना दुय्यम स्थान तर होतेच, शिवाय शिक्षणाचे धडेही त्यांना दिले जात नव्हते. कालांतराने यात बदल होत गेला, पुढे क्रांतीज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली. आज शिक्षणाच्या जोरावर मुली व महिला सर्वच क्षेत्रात मोलाची भूमिका बजावताना दिसून येतात. उच्च शिक्षण क्षेत्रामध्येही महिला अव्वल स्थानी आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये मागील पाच वर्षांत पदव्युत्तर विभागाचे उच्च शिक्षण घेण्यात मुलींची संख्या अधिक आहे.
मागील पाच वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांपेक्षा मुलींनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतलेला आहे. यामध्ये शैक्षणिक वर्ष 2016-17 ते 2020-21 या पाच वर्षाच्या कार्यकाळातमध्ये एकूण 2695 मुले तर 2879 मुलींनी यशस्वी पद्धतीने उच्चशिक्षण घेतलेले आहे. 184 संख्येने मुलींची संख्या अधिक आहे. आज संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे. या दिनाच्या पूर्वसंध्येला उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांच्या सन्मानार्थ ही एक चांगली माहिती समोर आली आहे.
‘चूल आणि मूल’ या प्रथेमध्ये कधीकाळी अडकलेल्या मुली व महिला आज मोठ्या हिमतीने मुलांच्या पुढे जाऊन उच्च शिक्षण घेत आपला झेंडा मोठ्या गौरवाने फडकविताना दिसून येत आहेत. यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये एक महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत बलशाली भारतासाठी योगदान देण्याचे कार्य आज महिला करीत आहेत. International Women’s Day Special: 2695 boys and 2879 girls were educated in the university in five years!
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कॅम्पसमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2016-17 मध्ये 445 मुले तर 414 मुली, 2017-18 मध्ये 373 मुले तर 410 मुली, 2018-19 मध्ये 388 मुले तर 456 मुली, 2019-20 मध्ये 624 मुले तर 691 मुली आणि 2020-21 मध्ये 865 मुले तर 908 मुलींनी शिक्षण घेतलेले आहे. मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येते. यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स, अर्थ सायन्समधील विविध विषयांचे शिक्षण घेण्यास मुलींनी अधिक पसंती दिलेली दिसून येते.
2004 ला सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाची चांगली सोय सोलापुरात झाली. आज त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. कॅम्पसमध्ये सुरवातीला पाच संकुले व आता अकरा संकुले सुरू झाल्याने विविध अभ्यासक्रमांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्याही वाढली आहे. यामध्ये मुलींची संख्या तुलनेने अधिक आहे. सोलापूर जिल्हाबरोबरच उस्मानाबाद, सांगली, सातारा जिल्ह्यातील मुलींनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कॅम्पसमध्ये आज शिक्षण घेत आहेत.
● शिक्षणाच्या जोरावरच प्रगती
आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ही आनंददायी बाब आहे. शिक्षणाच्या जोरावर महिला प्रगती करू शकतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळेच आज अंगणवाडी शिक्षिकेपासून ते पायलट आणि देशाच्या अर्थमंत्र्यापर्यंतची जबाबदारी समर्थ आणि सक्षमपणे महिला सांभाळत आहेत. महिलांना अधिक प्रमाणात उच्चपदांवर येण्याची गरज आहे.
सर्व क्षेत्रात महिलांना करिअरसाठी वाव आहे. आज पुरुषांच्याबरोबरीने तसेच त्यांच्याहीपेक्षा चांगल्याप्रकारे महिला काम करत आहेत. प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांची कामगिरी ही अभिमानास्पद असेच आहे. इंजिनिअरिंग, संशोधन क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटविला आहे. महिला या धाडसी असतात.
व्यवस्थापनाचे धडे त्यांना कुटुंबातूनच मिळतात. त्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य चांगले असते. महिलांनी उराशी स्वप्न व ध्येय बाळगून त्यासंदर्भात शिक्षण घेत प्रगती साधावी, अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे.