अयोध्या : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाकडे सध्या सर्वांच लक्ष लागलं आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. दरम्यान राम मंदिर उभारलं जात असताना जमिनीत दोन हजार फूट खाली ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र हे वृत्त चुकीचं असल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चंपत राय यांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “राम मंदिरं उभारलं जाणार आहे त्या ठिकाणी ५ ऑगस्ट रोजी जमिनीखाली टाइम कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याचं वृत्त चुकीचं आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका”.
महत्त्वाचं म्हणजे याआधी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य रामेश्वर चौपाल यांनीच टाइम कॅप्सूल ठेवलं जाणार असल्याची माहिती दिली होती. “राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक ‘टाइम कॅप्सूल’ ठेवण्यात येणार आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा असल्यास त्याला यामुळे रामजन्मभूमी बद्दलची केवळ तथ्यं सापडतील,” असं त्यांनी म्हटलं होतं.
* राम मंदिरातील रचनेत बदल
गर्भगृहापासून मंदिराच्या कळसाची उंची पूर्वी १२८ फूट इतकी होती, ती वाढवण्यात आली आहे. आता कळसाची उंची १६१ फूट इतकी असणार आहे. यात मंदिराच्या भिंती ६ फुटांच्या दगडांनी बांधण्यात येणार आहे. तर दरवाजा संगमरवरी दगडानं बनवण्यात येणार आहे. मंदिराच्या पूर्वीच्या रचनेत तीन कळस होते. मात्र सुधारित प्रस्तावात आता ५ कळस असणार आहेत. तर मंदिराला पाच प्रवेशद्वार असणार आहेत.