नवी दिल्ली : बहुचर्चित राफेल विमानांची पहिली तुकडी आज बुधवारी भारतात पोहोचली आहे. जगातील सर्वाधिक शक्तीशाली मानले जाणारी राफेल विमाने भारतीय वायूदलात सामील होणार असल्याने लष्कराची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. राफेल विमाने आपल्या मारक क्षमतेसाठी ओळखली जातात. चीनसोबत निर्माण झालेल्या वादाच्या पाश्वभूमीवर राफेलचे भारतात येणे महत्वाचे होते.
राफेल विमानांची पहिली तुकडी भारताच्या लष्करी ताफ्यात सामील झाली आहे. जगातील सर्वाधिक शक्तीशाली असणाऱ्या या लढाऊ विमानांमुळे भारताची लष्करी शक्ती कित्येक पटीने वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शत्रू राष्ट्रांना इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतीय वायूदलात राफेल विमाने सामील झाली आहेत. भारतीय वायूदलाच्या वाढलेल्या क्षमतेमुळे कुणाला काळजी करण्याची किंवा घाबरण्याची गरज असेल, तर ती आमच्या देशाच्या भूभागाला धोका निर्माण करु पाहणाऱ्यांनी, असं म्हणत त्यांनी नाव न देता चीनला दम भरला आहे. पक्षी सुरक्षितपणे अंबाला हवाई तळावर उतरले आहेत. राफेल लढाऊ विमानाच्या समावेशाने भारतीय लष्कराच्या इतिहासात नये युग सुरु होणार आहे. राफेल वायूदलाच्या क्षमतेत क्रांतीकारक बदल घेऊन येईल, असंही सिंह म्हणाले.
* संस्कृतच्या श्लोकातून स्वागत
संस्कृतच्या श्लोकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत राफेल विमानांचे अनोखे स्वागत केले. पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शहा, सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवरुन या ऐतिहासिक क्षणा बद्दल त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
‘राष्ट्ररक्षासमंपुण्यं,
राष्ट्ररक्षासमंव्रतम्,
राष्ट्ररक्षासमंयज्ञो,
दृष्टोनैवचनैवच।।
नभःस्पृशंदीप्तम्…
स्वागतम् !’
अर्थात राष्ट्र सुरक्षेसारखे पुण्याईचे काम दुसरे नाही. राष्ट्र रक्षेच्या व्रताप्रमाणे दुसरे व्रत नाही आणि राष्ट्र रक्षा सारख्या यज्ञाहून दुसरे मोठे यज्ञ नाही, अशी भावना पंतप्रधानांनी ट्विट करीत व्यक्त केली.
* पाच राफेल विमाने दाखल
सात हजार किलोमीटरचं अंतर कापून पाच राफेल विमाने आज भारतात पोहोचली. फ्रान्समधून उड्डान केलेली राफेल लढाऊ विमाने दुपारी हरियाणातील अंबाला येथे उतरली. हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया विमानांच्या आगमनावेळी अंबाला हवाई तळावर उपस्थित आहेत. सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत 36 राफेल विमानांसाठी तब्बल 59,000 करोड रुपयांचा करार करण्यात आला होता. त्यानुसार पहिली पाच राफेल विमाने हवाईदलाच्या ताफ्यात आज दाखल झाली आहेत. राफेल विमाने भारतीय लष्करासाठी गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे.