विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममधील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळून यात ११ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. डीसीपी सुरेश बाबू क्रेन कोसळून दुर्घटना घडल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडूंनी ट्विट करून दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ‘हिंदुस्तान शिपयार्डमधील मोठी क्रेन कोसळून 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समजलं. त्यावेळी तिथे 30 जण उपस्थित असल्याचं समजतं. ते सर्व सुरक्षित असावी, अशी मी प्रार्थना करतो,’ असं नायडूंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मृत्यू झालेले सर्व लोक हे तिथले कामगार आहेत. अपघाताचा एक व्हिडिओही समोर आला असून, त्यात क्रेन कोसळल्याचे दिसून येत आहे. एक प्रचंड क्रेन शिपयार्डमध्ये कोसळल्याने सध्या या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, बचाव आणि मदत कार्य चालू आहे. सध्या ढिगाराखाली अडकलेल्या काही लोकांना वाचविण्यात यश आले आहे.
ही घटना पाहून मंत्री अवंती श्रीनिवास यांनी अधिकाऱ्यांना प्रभावी पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या प्रचंड क्रेनवर एकूण 18 मजूर काम करत होते. दरम्यान, अचानक क्रेन तुटून ती खाली कोसळली. या अपघातात आतापर्यंत 11 मजूर ठार झाले आहेत. जखमी मजुरांना रुग्णालयात दाखल केले आहे. क्रेन लोड करण्याचा प्रयत्न चालू असताना हा अपघात झाला. वृत्तसंस्था एएनआयनुसार डीसीपी सुरेश बाबू यांनी घटनेची माहिती दिली. हिंदुस्तान शिपयार्डमध्ये क्रेन कोसळल्याने इतका मोठा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले.
अपघात झाल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी, विशाखापट्टणम जिल्हाधिकारी व शहर पोलिस आयुक्तांना क्रेन अपघाताच्या घटनेवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.