अक्कलकोट : राज्य सरकारचे शेतकर्यांच्या दूध प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने सरकारला जाग करण्यासाठी खासदार डाॅ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने दुधाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी आज अक्कलकोट ते सोलापूर रोडवर एमएसईबी कार्यालयाजवळ रास्तारोको आंदोलन केले. भाजपसह मित्रपक्षांच्या नेत्यांची उपस्थिती होती.
यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, सुरेखा होळीकट्टी, महेश हिंडोळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे, कांतु धनशेट्टी, मल्लीनाथ स्वामी, अप्पासाहेब पाटील यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी, दूध संकलन केंद्र, दुध संघाचे प्रतिनिधी व महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या वेळी महायुतीच्या घटक पक्षांच्या वतीने नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना दूध दरवाढी संदर्भात निवेदन देण्यात आले. या वेळी महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ, आमदार सचिन कल्याणशेट्टी, तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, आरपीआयचे तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे आदींनी महाएल्गार आंदोलनात मनोगत व्यक्त केले.
गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३० रुपये दर द्यावा, राज्य सरकाने प्रतिलिटर शेतकऱ्यांना दहा रुपयांचे अनुदान द्यावे, दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी भाजपसह मित्रपक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात घोषणाबाजी झाली. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांंबच्या लांब रांगा लावल्या होत्या. पोलीस निरीक्षक के.एस.पुजारी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
” सत्तेत आल्यावार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणा-यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. खत बियाणे बांधावर देऊ म्हणणारे आता शेतकऱ्यांना दुकानासमोर रांगा लावायला भाग पाडले आहेत. शेतकऱ्यांना उपेक्षित ठेऊन शेतीचे पुरक व्यवसायाला चांगले भाव देण्यास भाग पाडू” चित्रा वाघ – प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा
नेहमीप्रमाणे या आंदोलनातही खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मौन व सावलीत विश्रांती घेताना दिसले. माध्यमाचे फोटो फिरल्यानंतर ते आंदोलनात सहभागी झाले. राज्यभर आंदोलन छेडून सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू व दुधाला योग्य भाव मिळवून देऊ, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी ठणकावून सांगितले.
“शेतक-याच्या पाठीत खंजीर खुपसणारे हे विचार न जुळणारे तीन तोंडी पापी सरकार असून जास्त काळ टिकणार नाही. येत्या काळात यांची जागा शेतकरीच दाखविणार आहेत. भाव मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पाडू” – सचिन कल्याणशेट्टी, आमदार