मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून राजकारण सुरू असतानाच आता या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतली आहे. सुशांतसिंह राजपूतचं प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं जात आहे, त्यावरून मुंबईने माणुसकीच गमावलीय असं वाटतंय, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी पाटणा पोलीस मुंबईत आले आहेत. रोज या प्रकरणाला नवे वळण, नव्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणात आता माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणात महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
“सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात चौकशी करुन बिहार पोलीस फक्त कर्तव्य बजावत आहेत. यात कोणताही राजकीय हेतू नाही”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
“सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे.
* सुरक्षेच्या मुद्यावर युवासेनेचा टोला
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून राज्य सरकारवर निशाणा साधताना मुंबईतील सुरक्षिततेवर व पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर सुरक्षा कवच सोडून द्या,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे.
अमृता यांच्या या ट्वीटला युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांचं सुरक्षा कवच घेऊन फिरता आणि त्यांच्यावरच असे आरोप करता?,’ असा संतप्त सवाल वरुण सरदेसाई यांनी केला आहे. ‘मुंबई पोलिसांवर भरवसा नसेल तर हे सुरक्षा कवच सोडून द्या,’ असंही त्यांनी सुनावलं आहे. सरदेसाई यांच्या या ट्वीटमुळं हा वाद आणखी रंगण्याची चिन्हं आहेत.