सांगली : राम मंदीर भूमिपुजनाचा सोहळा येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या संदर्भात शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी त्यांनी ‘राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. साधू संत, महंत, नेते हे अयोध्येत राम मंदिर उभारणीसाठी एकत्र येत आहेत. मांगल्याचा आनंदाचा सण आहे. हा दिवस देशभरातील हिंदूंनी दसरा आणि दिवाळी सारखा आनंद उत्सव करावा. यापुढे रामाचा फोटो, मूर्तीमध्ये मिशा असलेला असावा, असंही संभाजी भिडे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. अयोध्येतील मंदिरात मूर्तींची प्रतिष्ठापना करताना सर्व पुरुष देवतांना पुरुषत्वाचे प्रतीक असलेल्या मिशा असाव्यात याची संबंधितांनी खबरदारी घ्यावी, तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण नसेल तरीही त्यांनी अयोध्येला जावे. असं, मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलं आहे.
राम मंदिराचे पतन झाल्यानंतर सुमारे ५०० वर्षांनी आयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन संपन्न होत आहे. गाव, खेड्यात हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करावा. या सोहळ्यात आयोध्येत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आगत्याने पूजन करावे, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केली.
* कोरोनामध्ये तथ्य नाही
कोरोनामध्ये तथ्य नाही, लॉकडाऊनमुळे लोकांना मुरगाळून टाकलं आहे. सोशल डिस्टनसिंग पाळू नये, देशातील नेत्यांनी घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा आहे. 5 ऑगस्टला रामजन्मभूमी उत्सव हा दसरा-दिवाळीसारखा साजरा करा, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं.
* शरद पवार, उद्धव ठाकरे गोंधळलेले
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अर्जुनासारखे गोंधळले आहेत. शरद पवार इतके ज्ञानी असून राम मंदिराबाबत ते असे बोलले कसे? राजकीय चलाकीच असली तरी, राष्ट्रीयदृष्ट्या त्यांचं वक्तव्य पाप आहे, असं टीकास्त्र संभाजी भिडे यांनी सोडलं. कोरोना म्हणजे, हिंदू समाजाच्या मानसिक दुर्बलतेचं लक्षण आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मशीदबाबत त्यावेळी केलेले वक्तव्य धाडसच होतं. मात्र आताच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ‘ऑनलाईन उदघाटन’ करा असं म्हणत असतील तर हे बाळासाहेबांना सुद्धा आवडलं नसते, असं संभाजी भिडे म्हणाले.
* सुशांत सिंह हा बेकार माणूस
“दुर्दैव असं आहे की समाजाने आदर्श समजले आहे ते सिनेमातील नट आणि नट्या, या नट नट्यांची त्यांची पात्रता काय? लायकी काय? त्यांची उंची काय? या नट नट्यांना आपल्या 1 अब्ज 35 कोटी जनतेचे मार्गदर्शन आणि दिशादर्शक म्हणून हा समाज स्वीकारतो म्हणजे या देशाचे लवकरात लवकर वाटोळे होणार आहे त्याचे ते निदर्शक आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले.
सुशांत सिंह बद्दल बोलून आयुष्य वाया घालवणे हे सुद्धा चूक आहे. हे आपण करायला नको. सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल, याची लायकी काय आहे. दुर्दैव हे आहे की उगवता तरुण वर्ग हा नट आणि नट्यांच्या थिल्लर अत्यंत उथळ, टाकाऊ मार्गाचं आकर्षण घेऊन जगतोय हे या देशाचे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं.