बार्शी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परिक्षेच्या आज जाहीर झालेल्या निकालात बार्शी तालुक्यातील चूंब येथील अविनाश भीमराव जाधवर याने अखिल भारतीय यादीत 433 वा क्रमांक मिळवून बाजी मारली. शेतकरी कुटुंबातील असलेल्या अविनाशने घरची परिस्थिती साधारण असतानाही कठोर परिश्रम करत हे यश मिळविले.
अविनाशचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच तर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण बार्शीतील श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात झाले. प्रत्येक परिक्षेत डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण होणार्या अविनाशने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. कृषी पदवीधर झाल्यानंतर त्याने आयएएस होण्याचे ध्येय बाळगले आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिल्लीतील खाजगी क्लासेसमध्ये दाखल होऊन त्याने जिद्दीने अभ्यास करत यशाचे क्षितिज गाठले. या दरम्यान येणार्या प्रत्येक अडचणीवर त्याने मात केली. तिसर्या प्रयत्नात त्याने हे यश मिळविले. लोकसेवेसाठी उच्च अधिकारपद मिळविण्याचे त्याचे ध्येय होते. त्यासाठी त्याने कठोर मेहनत घेतली.
अविनाशचे वडील भिमराव हे शेतकरी तर आई विमल या गृहिणी आहेत. भाऊ जनार्दन वकील आहेत. त्याला दोन विवाहित बहिणी आहेत. या सर्वांना अविनाशच्या स्वप्नाची कल्पना होती. त्यांनी हे यश गाठण्यासाठी त्याला जोरदार पाठबळ दिले. अविनाशच्या यशाची माहिती कळताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ग्रामस्थांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून त्याचे यश साजरे केले.