पुणे : पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. पुण्यातून पंतप्रधान कार्यालयात पोचणारे नवल किशोर राम हे तिसरे अधिकारी ठरले आहे.
नवल किशोर राम हे 2008 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांची पुण्यात जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. केंद्र सरकारमधील संचालक जे. श्रीनिवासन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या बाबतचा आदेश आज मंगळवारी पाठविला. नवल किशोर चार वर्षांसाठी राज्यातून आता प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारमध्ये जात आहेत. नवल किशोर राम हे नियमानुसार 3 आठवड्याच्या आत पंतप्रधान कार्यालयात उप सचिव म्हणून पदभार स्विकारतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या काही दिवसांपासून राज्यात तसेच पुण्यात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. पुुण्यात याआधी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आली होती. यानंतर आता पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोनाकाळात नवल किशोर राम यांनी जोखीम पत्करून काही निर्णय घेत पुण्यातील परिस्थिती उत्तमपणे हाताळली होती. त्यांची आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय यंत्रणा यांची उत्तम सांगड घालत ही जबाबदारी सक्षमपणे व यशस्वीपणे पार पाडली होती. याच त्यांच्या कामाची दखल आता केंद्र सरकारकडून घेण्यात आली असून त्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुण्यातून केंद्र सरकारच्या कार्यालयात नियुक्ती झालेले राम हे आत्तापर्यंतचे पुण्यातील तिसरे अधिकारी ठरले आहेत.