लातूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर (वय 91) यांचे आज पहाटे 2.15 पुणे येथे निधन झाले. आज निलंग्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोन दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी ते कोरोनातून मुक्त झाल्याचे जाहीर केले होते.
निलंगेकर यांना दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. ते पुण्यात होते. आज सकाळी त्यांचे शव पुण्याहून निलंग्याकडे रवाना होणार आहे. आज दुपारी अंत्ययात्रा निघणार असून आजच अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दोन दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर यशस्वी मात करुन ते घरी परतले होते. परंतु, पुन्हा त्यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे पहाटे उपचार सुरु असतानाच त्यांना मृत्यूने गाठलं.
त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. त्यांच्यावर आज निलंग्यात आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
शिवाजीराव निलंगेकर पाटील हे महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. 1985-86 मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होते. तर 1990-91 या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद होते.
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राजकीय जीवन संघर्षमय राहिले. अतिशय शिस्तप्रिय म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्यसेनानी म्हणून सरकारने त्यांचा गौरव केला. तरी स्वांतत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनचा लाभ त्यांनी कधी घेतला नाही. त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात त्या आधी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.