मुंबई : लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली आहे. गुगल क्लासरुम सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचेही सांगण्यात येतंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती दिली.
जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षणाचं पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
‘महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाकताना विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले. जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.’
सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झाले आहे. अशात कोरोनाने आपल्याला उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करुन दिली,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
* वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावे : मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो. गुगलमुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबवताना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावे. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुटच्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या. गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळीत सुरु होण्यास यामुळे मदत होईल.’
* शिक्षणातील अग्रेसर राज्य बनवणार : वर्षा गायकवाड
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन, ऑनलाईन संसाधने, प्लॅटफॉर्म, बँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. जी सूट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरुमसारखे विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिले. या परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करत असलेल्या सर्व शिक्षकांचे आभार. आतापर्यंत सुमारे दीड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी नोंदणी केली. गुगलसोबत शिक्षण क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानाच्या वापरासाठी दीर्घकालीन भागीदारी अपेक्षित आहे.’