नवी दिल्ली : हिंदुस्थानी बँकांना करोडोंचा चुना लावून पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या पुनर्विचार याचिकेवरील सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, याचे कारण धक्कादायक आहे. या खटल्याच्या फाईलमधील काही महत्वाची कागदपत्रे गायब झाली आहेत. न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्या प्रकरणाचा हा खटला आहे. कागदपत्रे गायब झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी टाळली टाळल्याची धक्कादायक माहिती आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
न्या. यू. यू. ललीत आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठाकडे या प्रकरणाची गुरुवारी सुनावणी झाली. या खटल्यातील विजय मल्ल्यासंदर्भातील एक महत्वाचे कागदपत्र गहाळ झाले आहे.
त्यामुळे पक्षकारांनी नवीन कॉपी सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. मल्ल्याने तीन वर्षांपूर्वी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ज्याची तारीख आज आली. मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत संपत्ती मुलांच्या नावे केली होती. त्यामुळे मल्ल्याला कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाने या निर्णयावर पुनर्विचार करावा यासाठी मल्ल्याने याचिका दाखल केली होती.
2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात जात त्याची संपत्ती कुटुंबियांच्या नावे केली होती. या प्रकरणी माल्ल्याने याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आपल्याच रजिस्ट्री अधिकाऱ्यांना ही याचिका अद्याप न्यायालयासमोर का आली नाही, असा प्रश्न विचारला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची नावेही विचारली होती. आता या याचिकेबाबत कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
* 9 हजार कोटी घेऊन पसार
विजय मल्ल्या हा 2 मार्च 2016 मध्ये कोणालाही खबर लागू न देता देशाबाहेर पळाला होता. ब्रिटेनचे पोलीस स्कॉटलंड यार्डने त्याला 18 एप्रिल, 2017 मध्ये अटक केली होती. मात्र, तेथील न्यायालयाने त्याला काही तासांतच जामिनावर सोडले होते. तेथील न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सुनावणी सुरु आहे. त्याच्यावर 17 बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे.