मुंबई : कर्नाटकातील बेळगावामधील मनगुत्ती गावातून शुक्रवारी एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हटवण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारानंतर शिवप्रेमींकडून राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटक सरकारच्याच आदेशानुसार, संपूर्ण पोलीस बंदोबस्तात एका रात्रीत हा पुतळा हटविण्यात आला. दरम्यान, आता कर्नाटक सरकारकडून ८ दिवसात परवानगी देऊन शिवरायांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
‘कर्नाटक सरकारने जर पुढच्या ८ दिवसात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला नाही तर ९ व्या दिवशी मनगुत्ती गावातील गावकरी शिवरायांचा पुतळा बसवतील’, असा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थिती पाहता कर्नाटक सरकारने सावध भूमिका घेत हा निर्णय घेतला आहे. सर्वत्र संताप व्यक्त होत असल्याने आज पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांची बैठक पार पडली. या बैठकीत कर्नाटक प्रशासनाकडून आठ दिवसांत परवानगी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानाने बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
बेळगावमध्ये घडलेल्या या प्रकारच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकमध्ये घडलेल्या प्रकारचे पडसाद हे राज्यभर प्रचंड तीव्रतेने उमटत आहेत.