मुंबई : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
“मी आणि माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांना कोरोनाची बाधा झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* या दिग्गजांनाही कोरोनाने घेरले
– देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याआधी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
– केंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
– कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी समोर आले.
– कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.