मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी दुसऱ्यांदा पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याविरुद्ध भूमिका घेतली आहे. सुशांतसिंह प्रकरणातही पार्थ पवारांनी पक्षाच्या विरोधात जावून गृहमंत्री यांना निवेदन दिले होते. आता पार्थ यांची भूमिका आजोबा शरद पवारांना पटणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहेत.
कोरोनाच्या संकटकाळात होत असलेले राम मंदिरचे भूमिपूजन यावर राष्ट्रवादी आणि शरद पवारांनी आपली परखड भूमिका स्पष्ट केल्यामुळे वादाचे चित्र निर्माण झाले होते. राम मंदिराच्या भूमिपूजनची घाई करण्याची काय गरज होती, कोरोनाचं संकट गेल्यानंतर हा सोहळा व्हावा, असे परखड मत जेष्ठ नेते शरद पवार यांनी मांडले होते. त्यानंतर राम मंदिर भूमीपूजन विषयावर पार्थ पवार यांनी पानभर पत्र लिहित आपली पक्षाच्या विरुद्ध असणारी भूमिका मांडली आहे. याआधीही संपूर्ण महाविकास आघाडी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे राहू द्या, अशी भूमिका घेत असताना पार्थ पवार यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अयोध्येत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. सध्या देश कोरोनाच्या सावटाखाली असल्याने या सोहळ्यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिराच्या मुद्द्यापेक्षा कोरोनाचा मुद्दा महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यांचे नातू आणि अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांनी काही सत्यांचा आपल्याला विसर पडता कामा नये, असे सांगत अयोध्येत राम मंदिर निर्माणाला पत्र लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचे हे पत्र चार दिवसामागचे असले तरी सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्या या भूमिकेवरूनची जोरदार चर्चा होत आहे चर्चेने जोर धरला आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देत उलट सुलट चर्चेला पूर्णविराम दिला आहे. देशात लोकशाही आहे. आणि लोकशाहीत आपली भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पार्थ पवार यांची भूमिक ही वैयक्तिक आहे. असे सांगत सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पत्राचा पक्षाशी काही संबंध नाही, असे देखील स्पष्ट केले आहे.
* नेमके काय म्हटले पार्थ पवार
भारतीयांच्या श्रद्धा व सांस्कृतिक अस्मितेचं प्रतीक असलेले श्रीराम अखेर आपल्या घरात येत आहेत. एका ऐतिहासिक क्षणापाशी आपण आलो आहोत. लोकशाहीमध्ये एखाद्या मोठ्या वादावर सामंजस्याने व शांततापूर्ण मार्गाने तोडगा कसा काढला जाऊ शकतो, हे रामजन्मभूमी प्रकरणातून दिसलं आहे. यातून बोध घेऊन विजयाच्या क्षणीही आपण नम्र असायला हवे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत,’ असं मत व्यक्त केलं. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असं आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केलं.