शिर्डी : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी शिवबंधन बांधत आज मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर शिवबंधन बांधत त्यांनी पक्षप्रवेश केला. ते सध्या उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.
शिवसेनेचे माजी आमदार आणि उपनेते अनिल भैय्या राठोड यांच्या काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नगर जिल्हयात शिवसेनेत पोकळी निर्माण झाली होती. मात्र शंकरराव गडाख यांच्या शिवसेना प्रवेशानंतर ती भरुन निघणार आहे. विधानसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नव्हता. मात्र गडाखांच्या प्रवेशाने आता शिवसेनेला नवसंजीवनी मिळणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अहमदनगरमधील अपक्ष आमदार आणि जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन बांधलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गडाख यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना शंकरराव गडाख यांना विशेष विमानाने मुंबईत आणणारे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही यावेळी उपस्थित होते.
शंकरराव गडाख यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून निवडणूक लढवली होती. आता गडाख यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केल्याने नगर जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढणार आहे.
“यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील,” असेही ट्विट त्यांनी केले आहे.
* शंकरराव गडाख यांच्याविषयी
शंकरराव गडाख हे काँग्रेसचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. ते अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आमदार आहेत. त्यांनी शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मोठ्या मताधिक्यांनं विजयी झाल्यानंतर त्यांनी सत्तास्थापनेदरम्यान शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री आहेत. शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या जवळचे मानले जातात.