पुणे : पुणे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने एक निर्णय घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सव मंदिरामध्येच साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनामुळे शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करीत आहोत. मंदिराच्या बाहेरून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवात भाविक गणरायाच्या चरणी मोठ्याप्रमाणावर हार, फुले, नारळ आणि पेढे अर्पण करत असतात. मात्र यंदा या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही मंडळाने यावेळी स्पष्ट केले.
उत्सव काळात मंदिरात अभिषेक, पूजा, आरती आणि गणेशयाग गुरुजी करणार आहेत. तर भाविकांच्या हस्ते दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. मात्र भाविकांनी नाव आणि गोत्र यांची ऑनलाईन नोंदणी केल्यास, गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील यंदा रद्द करण्यात आला आहे.
* एलईडी स्क्रिनसह कॅमेऱ्यांचे सुरक्षाकवच
गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये आणि परिसरात कायमस्वरुपी असलेल्या ६० सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जात आहेत.
* गणरायाचे ऑनलाईन दर्शन आणि आरती
यंदाच्या गणेशोत्सवात प्रत्यक्ष कार्यक्रम करणे शक्य नसल्याने मंडळामार्फत ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अथर्वशीर्ष या विषयावर प.पू. स्वानंदशास्त्री पुंड महाराज यांचे निरुपण, ११ ते ३१ ऑगस्ट दरम्यान दररोज दुपारी ४ वाजता होणार आहे. याशिवाय स्वराभिषेक देखील १८ ऑगस्टपासून सकाळी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये विविध कलाकार आपली कला श्रीं चरणी अर्पण करणार आहेत. उत्सवकाळात श्रीं ची आरती ऑनलाईन पद्धतीने भाविकांना अनुभविता येणार आहे. सकाळी साडेसात आणि रात्री ९ वाजता ही आरती भाविकांना सोशल मीडियाद्वारे घरबसल्या पाहता येणार आहे.
श्रीं चे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्ट मार्फत करण्यात आली असून वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील अशोक गोडसे यांनी केले आहे.