पुणे : पुणेकरांची तहान भागवणाऱ्या धरण साठ्याच्या क्षेत्रात संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याची पातळी वाढली आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी जलसाठा आहे.
संततधार पावसानं चारही धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. चारही धरणांमध्ये आतापर्यंत 18.13 टीएमसी म्हणजेच 62.21 % टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर तहान भागणार आहे. गेल्या वर्षीच्या 29.15 टीएमसी म्हणजेच 100 टक्क्याच्या तुलनेत जलसाठा कमी आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण भरल्यास जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार आहे. जुलै महिन्यात पाणी साठा कमी झाल्यानं पाणी कपातीची टांगती तलवार होती. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसानं दिलासा मिळाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यातील स्थलांतरित लोकसंख्या साधारण 52 लाख आहे. एवढ्या लोकसंख्येला महिन्याला दीड टिएमसी पाणीपुरवठा लागतो. त्यामुळे पिण्याची पाण्याची चिंता मिटली, तरी शेतीच्या पाण्याची समस्या मिटण्यासाठी धरण 100 टक्के भरणं आवश्यक आहे. हवामान विभागाने पुढील 6 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. शहर परिसर आणि धरण क्षेत्राच्या परिसरात हलका ते मध्यम तर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळं धरण पूर्ण भरण्याची शक्यता आहे.
* चार धरणात 62.21 टक्के पाणीसाठा
– खडकवासला 1.87 टीएमसी म्हणजेच 94.79 टक्के पाणीसाठा आहे.
– पानशेत 7.35 टीएमसी म्हणजेच 69 टक्के जलसाठा.
– वरसगाव धरणात 7.33 टीएमसी म्हणजेच 57.17 टक्के जलसाठा,
– टेमघर धरणात 1. 59 टीएमसी म्हणजे 42.80 टक्के आहे.