अकलूज : अंदाजे वर्षाचे लहान बाळ संशयास्पदरित्या घेऊन फिरणाच्या इसमास अकलूज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर बाळ कोणाचे आहे याबाबत तपास चालू आहे. पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबूल केला आहे. मात्र बाळ कोणाचे आहे हे तपासण्यासाठी तपास पथक गोव्याला जाणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ९ ऑगस्ट रोजी पहाटे ४:३० वाजता पोकॉ. संदेश रोकडे यांना चेतन इश्वर सोलंके (रा. विजयनगर कॉलनी, अकलूज) यांचा फोन आला की, मार्केट कमिटी अकलूज येथील गाळ्याच्या पत्राशेडमेध्ये एक संशयास्पद इसम एका लहान बाळासह आढळून आला आहे. तेव्हा त्या ठिकाणी महिला पोसई शिंदे, पोहेकॉ. घाटगे, मोरे असे पोहोचले असता हणमंत बाबुराव डोंबाळे (वय ६५ वर्षे रा. शेळगांव, ता. इंदापूर ) हा इसम बसलेला आढळला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याच्याकडे अंदाजे वर्षाचे लहान बाळ असल्याचे दिसले. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने माझे व पत्नीचे भांडण झाले आहे. म्हणून मी बाळाला घेऊन बाहेर पडलो आहे, असे सांगितले. त्याच्याकडे त्याच्या सासुरवाडीची चौकशी केली असता त्याने बारगांवमळा, एकशीव येथील त्याच्या मेव्हण्याचे नाव सांगितले. या गावातील पोलीस पाटील, सरपंच व त्याच्या मेव्हण्याकडे चौकशी केली असता, सदर इसम गेल्या १६ वर्षांपासून घरी आलेला नाही. तो त्याच्या पत्नीला सांभाळत नाही व त्याचा मुलगा १८ वर्षांचा असून मुलीचे लग्न झाल्याचे सांगितले.
मग त्याच्याकडे एवढे लहान बाळ आले कोठून, असा प्रश्न निर्माण झाल्यावर त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या दाखवताच सदर इसमाने हे बाळ मडगांव (गोवा) येथून उचलले असल्याचे सांगितले. हणमंत डोंबाळे यास आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. अकलूज पोलीस गोवा पोलीसांशी संपर्क साधत आहेत. सदर बाळाला पंढरपूर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ. राजु नायकवडी करत आहेत.17 तारखे पर्यंत आरोपीस पोलिस रिमांड मिळाली असून पोलिस तपास पथक गोवा येथे जाणार असल्याचे सांगितले.