सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्याबद्दल तिखट भाष्य केल्यानंतर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. माझी पोस्ट राजकीय नसून, पार्थ पवार यांच्या प्रेमापोटी व आपुलकीने केल्याचे स्पष्टीकरण मल्हार पाटील यांनी दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तुम्ही जन्मजात लढवय्ये आहात, असे म्हणत मल्हार यांनी पार्थ यांना समर्थन दिले. “माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे.” असे शरद पवार नातू पार्थ पवार यांच्या संदर्भात म्हणाले.
‘आपण जन्मजात लढवय्ये आहात, हे मी बालपणापासून पाहिले आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत, आणि झुंज कशी द्यायची हे आपल्याला माहित आहे’ असे मल्हार पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. माझी पोस्ट राजकीय नसून, पार्थ पवार यांच्या प्रेमापोटी व आपुलकीने केल्याचे स्पष्टीकरण मल्हार पाटील यांनी दिले.
मल्हार पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू, तर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे मल्हार पाटील आणि पार्थ पवार यांचे काका-पुतण्याचे नाते लागते. मात्र वयात फारसे अंतर नसल्याने दोघेही चांगले मित्र आहेत. हा पवार घराण्यातील वाद आणखी कोणत्या टोकापर्यंत जाणार, याबाबत साशंकता आहे. आता यात उस्मानाबादच्या पाटील घराण्याने उडी घेतली आहे.
पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाने गेल्याच वर्षी राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील उस्मानाबादमधून आमदारपदी निवडून आले आहेत.
* वडिल-पुत्राकडून प्रतिक्रिया
पक्ष आणि आजोबाविरोधी भूमिका घेतलेल्या पार्थ पवारांनी मला आजोबांच्या भाष्यावर काही बोलायचे नाही, असे म्हटले आहे. तर वडील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र शरद पवारांच्या भाष्यानंतर अजित पवारांनी मंत्रिमंडळ बैठकीतून थेट शरद पवारांच्या निवासस्थान गाठले आहे.