मॉस्को : रशियाने शोधून काढलेली लस बर्याच देशांनी विकत घेण्याची तयारी दाखवली असली तरी, ही लस किती प्रभावी आणि सुरक्षित आहे, हे अजून सिद्ध झाले नाही आहे. या लसीच्या नोंदणी दरम्यान रशियन सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांवरून या लशीच्या सुरक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला. कागदपत्रांमधून प्राप्त झालेल्या सर्वात महत्वाच्या माहितीनुसार, ही लस किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी क्लिनिकल टेस्ट पूर्ण झालीच नाही.
जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) जगभरातील वैज्ञानिकांनी रशियन लस sputnik-v बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार चाचणीच्या नावाखाली केवळ 38 स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला. याखेरीज हेही समोर आले आहे की ट्रायलच्या तिसर्या टप्प्याबाबत रशिया कोणतीही माहिती द्यायला तयार नाही, WHOनेही हा प्रश्न उपस्थित केला आहे.
रशियन सरकारने असा दावा केला आहे की सौम्य तापाशिवाय इतर कोणतेही साइड इफेक्ट दिसून आले नाही. मात्र कागदपत्रांमध्ये असे दिसून आले आहे की 38 स्वयंसेवकांमध्ये 144 प्रकारचे साइड इफेक्ट दिसून आले. चाचणीच्या 42 व्या दिवशीही 38 पैकी 31 स्वयंसेवकांमध्ये साइड इफेक्ट दिसले, याची माहिती मात्र कागदपत्रांमध्ये दिली गेली नव्हती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रशियाच्या लशीबाबत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रशियाने अद्याप WHOला लशीबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे रशियाने ही लस बनविण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही आणि म्हणूनच ती माहिती देऊ इच्छित नाही अशी शंका या संघटनेने व्यक्त केली आहे. रशियाचा असा दावा आहे की लसीच्या चाचणीच्या निकालांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा पुरावा चांगला आहे. निगेटिव्ह साइड इफेक्ट कोणत्याही स्वयंसेवकात दिसले नाहीत. मात्र, सत्य हे आहे की ज्यांच्यावर या लसीचा ट्रायल करण्यात आला त्यांना ताप, शरीरावर वेदना, शरीराचे तापमान वाढणे, खाज आणि इंजेक्शन दिलेल्या जागी सूज यासारखे साइड इफेक्ट दिसले. त्याशिवाय शरीरातील उर्जा कमी होणे, भूक न लागणे, डोकेदुखी, अतिसार, घश्यात सूज येणे, नाक वाहणे यासारखे तब्बल 144 साइट इफेक्ट दिसले.
* रशियाच्या वैज्ञानिकांनी डेटा दिला नाही
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वतः कबूल केले आहे की जेव्हा त्यांच्या मुलीने लसीचा डोस दिला तेव्हा तिलाही ताप आला होता पण ती लवकरच बरी झाली. पुतीन यांनी असा दावा केला की माझ्या मुलीच्या शरीरात अटिबॉडीज वाढले आहेत. मात्रहा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. रशियाने अद्याप या लसीच्या सर्व चाचण्यांशी संबंधित वैज्ञानिक डेटाही सादर केलेला नाही. तिसऱ्या टप्प्यात ट्रायल केला की नाही याबद्दलही शंका आहे.
* ब्रिटनला रशियावर संशय
ज्या वेगानं रशियानं लस शोधली, तो एक रेकॉर्ड आहे. कारण, आतापर्यंत सर्वात कमी वेळेत फक्त इबोला विषाणूची लस शोधली गेली आहे. कमी वेळ म्हणजे नेमका किती, तर तब्बल 4 वर्ष आणि जर रशियाचा दावा खरा मानला, तर रशियानं फक्त साडे तीन महिन्यात कोरोनाची लस शोधली आहे. म्हणूनच ब्रिटनसारख्या देशांना रशियाच्या संशोधनावर शंका आहे. मात्र रशियाला लसीची खात्री नसेल, तर ते स्वतःच्या जनतेला लस का देतील, रशियासारख्या बलाढ्य देशाचे थेट राष्ट्रपतीचं लसीची घोषणा का करतील आणि महत्वाचं म्हणजे खुद्द पुतीन स्वतःच्या मुलीला लस का टोचून घेतील, या सर्व प्रश्नांमुळे रशियाच्या लसीवर होणारे आरोप कमकुवत होतात. त्यामुळे येणाऱ्या दीड ते दोन महिन्यात रशियात काय होतं, रशियाचा कोरोना ग्राफ खाली घसरतो का, या प्रश्नांच्या उत्तरांवरुनच रशियाच्या लसीचं खरं-खोटं बाहेर पडणार आहे.