पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार दुखावले असून भाजपमध्ये जाणार का, असा सवाल विचारला जात असताना पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे. ते पुण्यात बोलत होते. पार्थ पवार यांना आजोबा शरद पवारांनी जाहीररित्या फटकारल्यानंतर पार्थ वेगळा निर्णय घेण्याची चर्चा रंगली होती. यावर भाजपाकडून या चर्चेची रंगतच काढून घेतलीय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“पार्थ पवार भाजपमध्ये येत नाही आणि आम्ही त्यांना घेतही नाही. त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे हा घरातला वाद आहे. आम्ही त्यात फार पडू इच्छित नाही. त्यांचा त्यांनी कुटुंबात सोडवावा” असे गिरीश बापट म्हणाले. पार्थ पवार यांनी ‘जय श्रीराम’चा नारा लगावल्याबद्दल प्रश्न विचारला असता, ‘जय श्रीराम’ एकटा पार्थ थोडी म्हणतो, सर्व जग म्हणतं, असंही बापट म्हणाले.
शरद पवार यांनी पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर कुटुंबात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांची भूमिका काय आहे, याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र बारामती दौऱ्यावर असलेल्या अजित पवार यांनी पार्थविषयी बोलण्यास नकार दिला. मला कुणाशीही काही बोलायचं नाहीय. मला माझं काम करायचं आहे, असं बोलून ते निघून गेले.