सांगली : म्हैसाळ योजना उद्या सोमवारपासून होणार कार्यान्वित होणार आहे. यामुळे तासगाव, जत, कवठेमहांकाळ, सांगोला,पंढरपूर दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
म्हैसाळ उपसा सिंचन योजना यावर्षी मार्च ते मे अखेर तीन महिन्यांसाठी उन्हाळी आवर्तनादरम्यान सुरु होती. पावसाचे आगमन झाल्यानंतर योजना बंद करण्यात आलेली होती. गतवर्षी कृष्णा नदीला पूर आलेला होता व अतिरिक्त पाणी वाहून गेले होते. त्याअनुषंगाने पूर परिस्थिती दरम्यान वाहून जाणारे अतिरीक्त पाणी म्हैसाळ योजनेद्वारे उचलून कायमस्वरुपी दुष्काळी भाग असलेल्या तासगाव, कवठेमहांकाळ, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्याच्या लाभक्षेत्रातील तलाव व बंधारे भरुन घेतलेस पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सूचीत केले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार जलसंपदा विभागामार्फत याबाबत कार्यवाही करण्यासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे. सद्यस्थितीत कृष्णा नदीला पूरसदृष्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता म्हैसाळ योजना उद्या सोमवारपासून कार्यान्वित केली जाणार आहे.
योजनेच्या लाभक्षेत्रातील कायमस्वरुपी दुष्काळी तालुक्यातील सर्व तलाव व बंधारे भरण्याबाबत सूचना जलसंपदा विभागाच्या अधिका-यांना दिल्या आहेत. यामध्ये साधारणपणे 2.50 टि.एम.सी पाणी उचलून लाभक्षेत्रातील 30 मोठे तलाव, 50 पाझर तलाव व 50 बंधारे भरण्याचे नियोजन आहे. त्यानुसार ही योजना उद्यापासून कार्यान्वित होत आहे.