सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. आज सोमवारी देखील पुन्हा अनेक भागात पाऊस कायम आहे. खरीप पिकांना हा पडणारा पाऊस पोषक असला, तरी रोजच पाऊस होत असल्याने शेतीकामात अडथळे येत आहेत. आजही दिवसभर कधी ढगाळ, कधी ऊन तर कुठे हलका पाऊस असे वातावरण आहे.
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. पण त्यात फारसा जोर नव्हता. शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस सुरु आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यानंतर सोमवारीही पहाटेपासूनच त्याने अनेक भागात हजेरी लावली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पावसाचे वातावरण असल्याने अनेक भागात साडेनऊ नंतरच ऊन पडले. पण त्यानंतरही कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाची अशीच काहीशी स्थिती होती.
दरम्यान, सततच्या या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत असला, तरी शेतीकामात मात्र अडथळा येत आहे. अनेक भागात सध्या मूगाची काढणी सुरु आहे. काही ठिकाणी अन्य पिकात खुरपणीची कामे सुरु आहेत. पण सततच्या पावसाने शेतीची कामे थांबली आहेत.
* शेतीची कामे थांबली
शुक्रवारपासून भीजपाऊस चालू आहे. पाऊस उघडीप घेण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतात दलदल निर्माण झाली आहे. वापसा झाले नसल्याने शेतीची मेहनत थांबली आहे. ऊसासाठी सरी सोडणे, पाळी मारणे, कांद्यांची लावण, रोप टाकणे, टाकले तर अतिपावसाने पिवळे पडत आहे. अति पावसामुळे अनेक शेतीकामे थांबली आहेत.