सोलापूर : लॉकडाउनमध्ये अडचणीत आलेल्या बळिराजाचे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. राज्य सरकारने शेतकर्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे. माझ्यासाठी विधान परिषदेची आमदारकी महत्वाची नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोलापुरातील आंदोलनात ठणकावून सांगितले.
दूध दरवाढीच्या विषयावर शेट्टी यांनी सोमवारी सोलापूर शहरातील चार हुतात्मा पुतळ्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढला. तेथे पोलिसांनी त्यांना अडविले. त्या वेळी ते बोलत होते. जनावरांसह बैलगाड्याचा आंदोलनात समावेश होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकर्याच्या दुधाला दरवाढ मिळणे महत्वाचे आहे. त्यानंतर बाकीच्या गोष्टी पाहू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच खरे शेतकरी असून, त्यांच्या माध्यमातूनच आतापर्यंत संघटनेच्या प्रत्येक आंदोलनास यश मिळाले आहे, असे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेट्टी म्हणाले की, राज्यातील 1 कोटी 19 लाख लिटरपैकी तब्बल 52 लाख लिटर दूध शिल्लक राहात आहे. आज दुधाला प्रतिलिटर केवळ 17 रुपयांचा भाव मिळत आहे. उत्पादन खर्च अधिक असतानाही शेतकर्याला अपेक्षित दर मिळत नाही. 21 जुलैला संप करून सरकारला तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यावेळी केवळ आश्वासन दिले. तोडगा मात्र काढला नाही. त्यामुळे परवानगी मिळत नसतानाही राज्यभर आंदोलने केली जात आहेत.
केंद्र सरकारने दूध भुकटी आयातीचा घेतलेला निर्णय तत्काळ रद्द करावा, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी बंद करावी, भुकटीसाठी निर्यात अनुदान द्यावे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी रवीकांत तुपकर, विजय रणदिवे यांच्यासह शेतकरी संघटनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
* शेतकरी संघटनेचे नगर, सातार्यात आंदोलन
शेतकर्याला सरकारने दोन महिन्यांचे पाच रुपयांप्रमाणे अनुदान द्यावे, दूध उत्पादकांना दोन महिने कालावधीतील अनुदानासाठी सुमारे 150 कोटी लागणार आहेत, ते द्यावेत. यानंतर 20 ऑगस्टला नगरमध्ये, तर 24 ऑगस्टला सातार्यात दूध दरवाढीचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.