सांगली : कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सांगली शहरातील आयर्विन पुलाजवळ आज 37 फुटापर्यंत पाण्याची पातळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड या परिसरात नागरिकांना महापुराचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.
कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात गेल्या दोन-तीन दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. धरणातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी सध्या कोयना धरणातून 50 हजार क्युसेक तर चांदोली धरणातून 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या सांगली शहरात कृष्णा नदीची पातळी 26 फुटावर आहे. या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन ही पातळी 35 ते 37 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास नदीकाठच्या सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, कर्नाळ रोड, काका नगर, दत्तनगर या परिसरात पाणी घुसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचारी नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी सुचना आणि नियोजन करत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* आलमट्टी धरण व्यवस्थापनाशी चर्चा
कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे सांगली शहरात आयर्विन पुलाजवळ पाणी पातळी 35 फुटापर्यंत जाण्याची शक्यता आहे. तसेच यामध्ये एक दोन फुटाचा फरक पडू शकतो. कोयना, वारणा, उरमोडी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य धरणातून असा महाराष्ट्रातून सुमारे सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. आलमट्टी धरण व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा करून अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक इतका विसर्ग करावा, अशी विनंती केली आहे. दोन्ही राज्यांच्या समन्वयातून यावेळी महापुराचा प्रश्न बिकट होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.
* एनडीआरएफचे दोन पथक तयारीत
आर्यविन पूल येथे पाणी पातळी वाढली आहे. तरी नदीकाठच्या विशेषत: वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगरपालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील लोकांनी सावधानता बाळगावी व नदीपात्रामध्ये कोणीही जावू नये, असे आवाहन केले आहे. एनडीआरएफचे दोन पथक आष्टा येथे व एक सांगली येथे तयारीत ठेवण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
* आपत्ती नियंत्रणाचे क्रमांक जाहीर
खबरदारी म्हणून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यातबाबत आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष क्रमांक 1077 व 0233-2600500 व पाटबंधारे नियंत्रण कक्ष 0233-2301820/ 2302925 वर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.