मुंबई : गेले काही दिवस बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणावरून पत्रकार अर्णब गोस्वामी वारंवार शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारून शिवसेनेलाच आरोपीच्या पिंज-यात उभे करीत आहेत. मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी शब्दात उल्लेख केला जात आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अर्णब गोस्वामीवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अर्णब गोस्वामींची हे कुठल्याही पुराव्याशिवाय महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्र्यांवर बेछूट आरोप लावण्यापर्यंत मजल गेली आहे. या पूर्वीच बातम्या प्रसारित करताना राजकीय नेत्यांवर खासकरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांवर वाईट शब्दांत आरोप केले होते. त्यामुळे उभा महाराष्ट्र अर्णब गोस्वामींवर कारवाई करण्याची वाट पाहत आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी विनंती या पत्रातून खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्र्यांना केली आहे.
अर्णब गोस्वामी अत्यंत वाईट पद्धतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गुन्ह्यासंदर्भात विभाजक आणि बेजबाबदार बातम्या खळबळजनक प्रसारित करुन अर्णब गोस्वामी समाजात तेढ निर्माण करुन लोकांना चिथावणी देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, अशी भीती सावंत यांनी व्यक्त केली आहे.