पुणे : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा यासाठी मोठी मोहीम चालवण्यात आली. मात्र, पुण्यातील आयुर्वेद डॉक्टर चैत्राली कुलकर्णी यांचा देखील असाच संशयास्पद मृत्यू झाला होता. परंतु, तिच्या मृत्यूची चौकशी होऊन तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली नाही.
यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या तिच्या वडिलांनी आणि आईने जंग जंग पछाडूनही त्यांना दाद मिळालेली नाही. आधी पोलिसांनी आणि त्यानंतर सीआयडीकडे तपास गेल्यानंतरही चैत्रालीच्या मृत्यूचं गूढ उकललेले नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चैत्राली ज्या कॉलेजमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या प्रमुखांचे राज्यातील बड्या राजकीय नेत्यांशी लागेबांधे असल्यानं पोलीस या प्रकरणाची चौकशी करत नसल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केलाय.
त्याचबरोबर सुशांत सिंह प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशी देखील सीबीआयमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळं सुशांतला जर न्याय मिळाला असं म्हटलं जात असेल तर चैत्रालीला न्याय कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होतोय. सुशांत सिंह प्रमाणे चैत्रालीच्या मृत्यूची चौकशी देखील सीबीआय मार्फत करण्यात यावी अशी मागणी चैत्रालीच्या आई-वडिलांनी केलीय. आज ना उद्या आपल्या लेकीला न्याय मिळेल आणि तिच्या मृत्यूच्या कारणांचा उलगडा होईल या आशेने सुनील कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी श्रुती कुलकर्णी पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवत आहेत.
आधी पुणे पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या कार्यलयाचे आत्तापर्यंत 97 वेळा त्यांनी उंबरठे झिजवलेत. मात्र, तपास चालू आहे, यापलीकडे त्यांना उत्तर मिळालेलं नाही. 19 संपतेंबर 2016 ला चैत्राली पुण्याजवळील वाघोलीतील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टकडून चालवल्या जाणाऱ्या तिच्या आयुर्वेद कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली. पण दुपारी तिच्या वडिलांना तिची बॅग खडकवासला धरणाजवळ सापडली असून ती गायब असल्याचा फोन आला. तिचे वडील लगबगीनं खडकवाला धरणाजवळ पोहचले असता तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. चैत्रालीच्या नातेवाईकांना मृतदेह न दाखवताच तो पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आला, असा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे.
* चंद्रकांत पाटील यांच्याकडून अपेक्षाभंग
भाजप नेते चंद्रकांत पाटील कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरीही गेले. मात्र, तपासात कोणतीही प्रगती झाली नाही. चंद्रकांत पाटील आणि त्यावेळचे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून आपला अपेक्षाभंग झाल्याची भावना कुलकर्णी पती-पत्नी व्यक्त करतात. पुण्यातील भाजप नेत्याचे चैत्राली ज्या आयुर्वेद कॉलजेमध्ये शिकत होती, त्या कॉलेजच्या विश्वस्तांशी असलेल्या लाग्याबांध्यांमुळे पोलीस तपास करत नसल्याचं कुलकर्णी दांपत्याचं म्हणणं आहे.