सोलापूर : नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सोलापूर विभागात देखील सुरु करण्यात येणार आहे. आज शुक्रवारपासून ही किसान रेल्वे सुरु होणार आहे.
सोलापूर आणि पुणे विभागातील कोल्हापुर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरात डाळींब, केळी, द्राक्षे, इत्यादी फळे, भाजीपाला तसेच शेती मालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. त्यामुळे या मार्गावर देखील किसान रेल्वे सुरु होणार असल्याने शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही किसान रेल्वे कोल्हापुरातून निघेल त्यानंतर मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकावर थांबेल. सदर गाडीचे डब्बे गाडी क्र. 00107/00108 देवलाली-मुझफ्फरपूर-देवलाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापुर (पटणा) आणि मुझफ्फरपूर यापरिसरात नाशवंत कृषी माल पाठवण्यात येईल. यामुळे शेतकरी आणि व्यापाराचा माल सुरक्षित आणि जलद गती पोहोचवण्यात येईल.
किसान रेल्वे गाडी क्र. 00109 कोल्हापूर ते मनमाड ही गाडी कोल्हापुरहून 21 ऑगस्ट- 2020 ते 25 सप्टेंबर- 2020( प्रत्येक शुक्रवारी) रोजी सकाळी 5.30 वाजता प्रस्थान होईल आणि गाडी क्र. 00110 मनमाड ते कोल्हापूर ही गाडी मनमाडहून 23 ऑगस्ट-2020 ते 27 सप्टेंबर-2020 (प्रत्येक सोमवारी) रोजी रात्री 8 वाजता प्रस्थान होईल.
या पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाहीये. प्रस्थान स्थानक आणि मार्गातील स्थानकावर प्रवाशांनी यात्रा करू नये तसेच मध्य रेलवे सोलापूर विभागतील शेतकऱ्यांनी आणि उद्योगजांनी या किसान रेल पार्सल गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ वाणिज्य मंडळ प्रंबधक प्रदीप हिरडे यांनी केले आहे.