सांगली : कोविड उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या हॉस्पीटलकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत आहेत. त्या अनुषंगाने शासनमान्य दराने बिलांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे.
या पथकाकडे लेखा तपासणीसाठी आतापर्यंत 379 देयके प्राप्त झाली. यापैकी तफावत असलेल्या 136 देयकांमधील 7 लाख 95 हजार 366 रूपयांची तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश केले आहे. तर रूग्णालयांनी औषधाच्या व तपासणीच्या पावत्या सादर न केल्याने 19 लाख 89 हजार 993 रूपयांची देयके आक्षेपाधीन ठेवली आहेत. लेखा तपासणीनंतर देयकांमध्ये अनियमतेबाबत विविध रूग्णालयांना एकूण 99 नोटीस बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आतापर्यंत विविध रूग्णालयांतील 136 देयकांमध्ये तफावत आढळून आली आहे. याबाबत भारती हॉस्पीटल 6, कुल्लोळी हॉस्पीटल 29, विवेकानंद हॉस्पीटल 5, सेवासदन 12, मिशन हॉस्पीटल 24, घाटगे हॉस्पीटल 10, मेहता हॉस्पीटल 12 व सिनर्जी हॉस्पीटल सांगली यांना 1 अशा विविध प्रकरणी एकूण 99 नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ज्यांचा खुलासा समाधानकारक नाही आणि अतिरिक्त बिलाची रक्कम जी रूग्णालये रूग्णांना परत करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.
सदर लेखा तपासणी पथक देयकांच्या अनुषंगाने नर्सिंग, आयसोलेशन,शुल्क आकारणीबाबत काटेकोरपणे तपासणी करीत आहे. लेखा तपासणी पथकास आत्तापर्यंत 1 कोटी 77 लाख 12 हजार 649 रूपयांची 379 देयके प्राप्त झाली असून यापैकी 136 देयकांमध्ये तफावत आहे. यामधील 7 लाख 95 हजार 366 इतकी तफावतीची रक्कम संबंधित रूग्णांना परत करण्याबाबत आदेश केले असून यापैकी आतापर्यंत जादा बील आकारणी झालेल्या एका हॉस्पीटलने रूग्णास 41 हजार 79 रूपये रक्कम परत केली आहे तर अद्याप विविध रूग्णालयांनी रूग्णास परत करावयाची रक्कम 7 लाख 54 हजार 287 रूपये इतकी आहे.