भोपाळ : भारत देशात एक असे झाड आहे ज्याला दिवसरात्र सुरक्षा आहे. त्याला फक्त व्हीआयपी नव्हे तर व्हीव्हीआयपी उपचार दिली जातात. ते आजारी पडले तर त्याला एखाद्या माणसाप्रमाणे इंजेक्शन आणि सलाईन लावली जाते. या झाडाभोवती 24 तास पोलिसांचा पहारा असतो. इतकेच नाही तर या झाडाच्या देखभालीसाठी वर्षाकाठी 12 ते 15 लाख रुपये खर्च केला जातो. वाचा काय आहे हे सविस्तर.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि विदीशादरम्यान सलामतपूरमध्ये एक झाड आहे. या झाडावर राज्य सरकार 12 ते 15 लाख रुपये खर्च करते, अशी माहिती मिळाली आहे. इतकेच नाही तर या झाडाच्या सुरक्षेसाठी 24 तास पोलीस तैनात असतात. या झाडाच्या संरक्षणासाठी भोवताली 15 फूट जाळी लावण्यात आली आहे. या झाडाला पाणी देण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून एका पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली आहे.
या झाडाला कुठलीही रोगराई किंवा कीड लागू नये म्हणून कृषी अधिकारी दर आठवड्याला एक दौरा करतात. या झाडाची संपूर्ण देखभाल जिल्हाधिकारी करतात. या झाडाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांसाठी एक पक्का रस्ताही शासनाने बनवला आहे. फेब्रुवारी महिन्यात हे झाड आजारी पडलं होतं, म्हणजेच त्याच्यावर रोग पडला होता. वातावरणातील बदल आणि किड्यांमुळे झाडाची पाने काळी पडायला लागली होती आणि त्यांना भोकेही पडायला लागली होती. झाड आजारी पडल्याने चिंतेचं वातावरण पसरलं होतं. तत्काळ तज्ज्ञांना बोलावण्यात आलं आणि झाडावर इलाज सुरू करण्यात आले. माणसाला ज्या पद्धतीने इंजेक्शन आणि सलाईन लावली जाते, त्याच पद्धतीने झाडाला इंजेक्शन देण्यात आली आणि सलाईनही लावण्यात आली.
हे झाड 8 वर्षांपूर्वी लावण्यात आलेलं आहे. राजपक्षे यांनी 21 सप्टेंबर 2012 रोजी हे रोपटे लावले होते. भूतानचे तत्कालीन पंतप्रधान जिग्मी योजर थिंगले हे देखील यावेळी उपस्थित होते. हे छाटेसे रोपटे आता डेरेदार वृक्षात बदलायला सुरूवात झाली असून हे झाड आता 20 फूट उंच झाले आहे.
* गौतम बुद्धांच्या अस्तित्वाचे प्रतीक
हे झाड श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी लावले होते. हे झाड साधेसुधे नसून गौतम बुध्दांना ज्या झाडाखाली मोक्ष प्राप्त झाली होती. त्या झाडाची फांदी रोवण्यात आली होती. या फांदीचे रुपांतर आता वृक्षामध्ये होऊ लागले आहे. हे झाड म्हणजे गौतम बुद्धाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जात असल्याने या झाडाची इतकी काळजी घेतली जाते.