बार्शी : नगरपालिकेच्या मत्स्यविक्री केंद्राजवळ दुपारी कर्मचार्यांनी भरलेली गाडी आली, काही काळ थांबली आणि गेली. गाडी येण्यापूर्वी मत्स्यविक्री चालूच होती, गाडी आल्यानंतर विक्रेत्यांची थोडी पळापळ झाली, परंतू काही मिनिटात गाडी गेली की पुन्हा मत्स्यविक्री सुरुच राहिली. पर्यूषण पर्वानिमित्त मांस विक्री बंद ठेवण्याच्या सूचना असतानाही मांस विक्री चालू असल्याचे पाहवयास मिळाले.
शहरातील तालुका पोलिस ठाण्याच्या इमारतीसमोर असलेल्या मच्छी मार्केट समोर हा प्रकार घडला. पर्यूषण पर्वानिमित्त मांस विक्री बंद ठेवण्याच्या सूचना असल्यामुळे हे केंद्र बंद आहे की नाही, पहाण्यासाठी हे कर्मचारी आले होते, मात्र या केंद्रातील म्होरक्याला बाजूला घेवून थोडी चर्चा झाल्यानंतर कर्मचारी आनंदाने दुसर्या ठिकाणी पहाणीसाठी निघून गेल्याचे अनेक नागरिकांनी पाहिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरात सध्या कोरोना निमित्ताने नगरपालिकेने अनेक सर्वेक्षण पथके तयार केली आहेत. त्यांच्या दिमतीला पोलिस आणि गाडीही दिली आहे. याच पथकाकडे आज रविवारी मांस विक्री आस्थापना बंद आहेत कि नाहीत, हे पहाण्याची जबाबदारी होती. एमएच 13 पी 0411 क्रमाकांच्या नगरपालिकेच्या जीपमधून हे पथक आले होते. या पथकाची गाडी मच्छी मार्केट समोर उभी राहिली की विक्रेत्यांना या गाडीचे येण्याचे कारण लगेच उमगले.
त्यांनी लगेच बंद आहे, बंद आहे, असा गलका सुरु गेला. तरीदेखील काही कर्मचारी गाडीतून उतरून आत जावून पहाणी करुन आले तेंव्हा त्यांना मार्केट चालूच असल्याचे दिसले. मग त्यातील काही कर्मचार्यांनी तिथल्या महोरक्याला बाजूला या असे खुणावत थोडे पलीकडे नेले. अवघे काही सेकंदच त्यांच्यात चर्चा झाली आणि मार्केट बंद आहे, अशा अविभार्वात गाडी निघून गेली. विक्रेत्यांनी मात्र हे नेहमीचेच आहे, आम्हाला त्याची सवय आहे, असे सांगत आपल्या कामाला पुन्हा सुरुवात केली.