सोलापूर : डॉ. वैशंपायन स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक तथा आनंदश्री प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. वासुदेव रायते यांचे आज रविवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. माधवी रायते, मुलगा डॉ. नीरज रायते, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुंभारी येथील डॉ. अश्विनी सहकारी रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यातच दोन दिवसापूर्वी त्याचा कोरोना अहवाल पाँझिटीव्ह आला. उपचार सुरु असतानाच आज रविवारी दुपारी दोन वाजता त्यांचे निधन झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉ. वासुदेव रायते यांनी पुणे, मुंबई, मिरज, अंबाजोगाई आणि सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात २५ वर्षे अध्यापन केले. मेडिसिन विभागाचे ते काही काळ प्रमुख होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील मेडिसिन अभ्यास मंडळाचे ते सभापती होते. डायबिटीस असोसिएशन ऑफ इंडिया मुंबई या संस्थेचे ते आजीव सदस्य होते. डायबेटिक सेल्फ केअर फाउंडेशन नवी दिल्ली, असोसिएशन ऑफ फिजिशियनस ऑफ इंडिया मुंबई, रेडक्रॉस सोसायटी ऑफ इंडिया सोलापूर तसेच सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंचचे ते आजीव सदस्य होते.
निष्णात डॉक्टर, निसर्गप्रेमी, समाजिक कार्याची आवड असणारे, साहित्याचा उपासक तसेच संगीतावर अलोट प्रेम करणारा रसीक अनंताच्या प्रवासाला निघुन गेला. महाराष्ट्र साहित्य परीषद जुळे सोलापुरच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
* विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवले
साहित्य, संगीत, सामाजिक, पर्यावरण या विषयावर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. यामध्ये लायन्स इंटरनॅशनल क्लबचा राज्यस्तरीय वृक्षसंवर्धन पुरस्कार, सोलापूर महापालिकेचा महापौर सन्मान, स्वर्गीय दीनदयाळ ग्रामीण विकास संशोधन प्रशिक्षण संस्थेचा वृक्षमित्र पुरस्कार, पुण्यातील डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाचा डॉ. आजगावकर स्मृती पुरस्कार, बँक ऑफ इंडिया शताब्दी महोत्सव आणि बँक ऑफ महाराष्ट्राचा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा निसर्गमित्र पुरस्कार, मधुमेह मित्र मंडळ मिरज- सांगलीचा जीवनगौरव पुरस्कार, सोलापूरच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा जीवनगौरव पुरस्कारांचा समावेश होता.