नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे अनेक देशांनी परदेशी प्रवाशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विमान प्रवासावर निर्बंध आणले आहेत. काही देशांमध्ये अजूनही लॉकडाउन सुरू आहे. अशात एका ट्रॅव्हल एजन्सीने दिल्ली ते लंडन बससेवेची घोषणा केली आहे. हा प्रवास 15 लाखाचा आहे. यात 70 दिवसात 18 देशांमधून दिल्ली ते लंडन प्रवास करावयास मिळणार आहे.
गुरुग्राममधील एका खासगी प्रवास कंपनीने ‘बस टू लंडन’ नावाची एक ट्रिप आयोजित करत असल्याचे जाहीर केले आहे. ही ट्रिप 70 दिवसांची असणार आहे. पुढील वर्षी अर्थात मे 2021 मध्ये या बसचा प्रवास सुरू होईल. दिल्लीपासून थेट लंडनपर्यंतचा प्रवास करण्यासाठी एका व्यक्तीला 15 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ईएमआयचा पर्यायही कंपनीने ठेवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
15 ऑगस्ट रोजी ‘ऍडव्हेंचर ओव्हरलँड’ कंपनीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ‘बस टू लंडन’ या ट्रिपबाबत माहिती दिली. 70 दिवसांमध्ये 18 देशांमधून प्रवास करत ही बस लंडनमध्ये पोहोचेल. भारतातून सुरू होणारा हा प्रवास म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिजस्तान, उजबेकिस्तान, कजकिस्तान, रशिया, लातविया, लिथुआनिया, पोलंड, चेक रिपब्लिक, जर्मनी नेदरलँड, बेल्जियम, फ्रान्स अशा 18 देशांमार्गे हा प्रवास असेल.
* वीस प्रवासीच राहणार
20,000 किलोमीटरच्या या बस प्रवासासाठी बुकिंगला सुरूवात झाली आहे. पण, केवळ 20 प्रवासीच या बसमधून प्रवास करु शकणार आहेत. ‘बस टू लंडन’च्या या प्रवासामध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी खास बस तयार करण्यात आली आहे. बसमधल्या सगळे सीट बिजनेस क्लासचे असतील. बसमध्ये 20 प्रवाशांशिवाय एक ड्रायव्हर, एक असिस्टंट ड्रायव्हर, ट्रिप आयोजित करणाऱ्या कंपनीचा एक केअरटेकर आणि एक गाईड असतील. 18 देशांच्या प्रवासामध्ये गाईड देखील बदलले जातील. 70 दिवसांच्या या प्रवासात हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था असेल. यासाठी फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलची निवड केली जाईल.