मुंबई : दीड-दोन महिन्याखाली देशात ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले. यामुळे देशातील काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत सुरू केले. तरीही महाराष्ट्र सरकार तशी घाई करणार नाही. त्यामुळे १ सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहील, असे सूतोवाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
ठाण्यात कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी आले होते. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ठाकरे म्हणाले, जगभरातील काही देशांनीही काही गोष्टी घाईगडबडीने सुुरू केल्या. मात्र महाराष्ट्र अशी घाईगर्दी करणार नाही. कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन सुरू केल्या आहेत. पण, ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल, याची खात्री नाही त्या सुरू केल्या नाहीत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, राज्यातील रेस्टॉरंट, चित्रपटगृहे उघडली जाण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, जिमबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय होऊ शकतो.
* नवीन शैक्षणिक वर्षाबाबत संभ्रम
१ सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शिवाय, शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारपुढे ठेवला आहे. ११ वी प्रवेशासाठी सगळीकडे झुंबड उडालेली असली तरी नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे.