सोलापूर : न्यू पाच्छा पेठेतील कुंचीकोरवी गल्ली पोशमा मंदिराजवळील इमारतीमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकल्यानंतर झालेल्या पळापळीत परवेज इनामदार याचा मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, सुनील कामाटी यांना अटक करावी, अशी भूमिका त्याच्या नातेवाईकाने घेतली. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सीआयडी चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी 22 जणांना अटक केली असून यातील सहा जणांना न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. कुंचीकोरवी गल्लीतील पोशम्मा मंदिरजवळील दोन मजली इमारतीमध्ये मटक्याचा अड्डा सुरू होता. शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक छापा टाकण्यासाठी गेले होते. पोलीस आल्याचे समजताच आतमध्ये असलेल्या मटका बुकीवाल्यांनी दुसर्या मजल्यावरून उड्या मारल्या. यात परवेज इनामदार याचा पत्र्यावर पडून मृत्यू झाला. त्याचा मृतहेह शवविच्छेदनासाठी सिव्हीलला पाठवण्यात आला होता.
आज मंगळवारी सकाळी परवजेचा चुलत भाऊ रफिक इनामदारसह त्याची पत्नी, मुले आणि नातेवाईक सिव्हील येथे गेले आणि त्यांनी सीआयडी चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
* मारहाण झाल्याचा संशय, नातेवाईकांचा आरोप
परवेज याला घटनास्थळी मारहाण झाल्याचा आम्हाला संशय आहे. त्याला कोणी मारहाण केली, याचा तपास केला पाहिजे. याची सीआयडी चौकशी होणे गरजेचे आहे, असे चुलत भाऊ रङ्गिक इनामदार यांनी मागणी केली. तर त्याच्या पत्नीने पोलिसांबरोबर परवेज यांची झडप झाली. यातून त्याने उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. याची चौकशी करावी आणि मटका चालवणारे सुनील कामाटी यांना अटक करण्याची मागणी केली.
* अटक करण्यात आलेले आरोपी
आकाश कामाटी, इस्माईल मुच्छाले, स्टिफन स्वामी, शंकर धोत्रे, सूरज कांबळे यांच्यासह शिवराम विठ्ठल फुटाणे, रियाज चॉंदपाशा काझी, केदार बोरामणी, श्रीरंग बाबुराव भोसले, प्रकाश ईश्वरप्पा हिट्टनळ्ळी, महेश आण्य्या स्वामी, राजकुमार चंद्रकांत उडचाण, अंबादास श्रीनिवास कौंतम, जाकिर महमदसाब शेख, प्रमोद रमेश देवकते, सलीम अब्दुल रहेमान फणीबंद, फैय्याज महमुलाल शेख, मोहन भालचंद्र बोगा, भिमाशंकर चंद्रकांत सोलापूर, भिमाशंकर रेवणसिध्द करजगी, संदिप सुरेश कांबळे, सुनिल चंद्रकांत आष्टगी, आनंदप्पा काशप्पा बामदी, यादगिरी नरसप्पा भंडारी, संदेश चितली, सिध्दाराम मनोहर इंगळे, रियाज इक्बाल मनियार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
* सुनील कामाठी फरार
यापैकी नगरसेवक सुनील कामाटी फरार आहे. वरील सर्व आरोपींना मंगळवारी न्यायालयात उभे केले असता स्टिफन स्वामी, रियाज काझी, प्रकाश हिट्टनळ्ळी, भीमाशंकर करजगी, संदेश चिताली, रियाझ मणीयार यांना एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली असून उर्वरित आरोपींची न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे. पो.नि.राऊत तपास करीत आहेत.
* पोलीस स्वामीला अटक, कामाठीचा शोध सुरू
भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी व पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी या दोघांच्या भागीदारीमध्ये मटका चालवला जात होता. ही बाब गुन्हे शाखेच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी हा फरार झाला आहे. या व्यवसायामध्ये आणखी किती भागीदार आहेत आणि ते कोण आहेत याचा शोध घेतला जात आहे.