बार्शी : आई-मुलाचं नातं जगातील सर्वश्रेष्ठ समजलं जातं, मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना तालुक्यातील वांगरवाडी येथे घडली असल्याचे आज उघडकीस आली. जिने जन्म दिला तिनेच निर्दयीपणे पोटच्या गोळ्याचा खून केल्यामुळे, सगळा तालुका सुन्न झाला आहे. माता न तूं वैरिणी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
केवळ दोन मुलांतील अंतर खूप कमी आहे. पहिला मुलगा दीड वर्षाचा झाला नाही तोवरच दुसरा जन्मला आणि दोघांना सांभाळायचा खूप त्रास होतो. दुसरा अवघा 9 महिन्याचा सार्थक खूप रडतो, सारखी किरकिर करतो म्हणून तिने मोबाईल चार्जरच्या वायरीने त्याचा गळा आवळला आणि चोरीचा देखावा करत चोरट्याने त्याला ठार मारल्याचा बनाव केला. मात्र पोलिसांच्या चौकशीत ती टिकू शकली नाही. आणि शेवटी तिने आपणच मुलाला मारल्याची कबुली दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तालुक्यातील वांगरवाडी येथे भर दुपारी झालेल्या सार्थक स्वानंद तुपे या 9 महिन्याच्या बालकाच्या खूना प्रकरणी तालुका पोलिसांनी त्याची आई आश्विनी तुपे हिला आज अटक केली. दै. ‘सुराज्य’ने फिर्याद संशयास्पद असल्याबाबत वर्तवलेला अंदाज अचूक निघाला. दिवसाढवळ्या चोरट्यांकडून चोरीसाठी बालकाचा बळी घेतला गेल्याच्या प्रारंभीच्या माहितीवरुन तालुका हादरला होता. लोक दहशतीखाली आले होते. मात्र फिर्यादीची हकिकत वास्तवाला दुजोरा देत नव्हती. त्यामुळे संशयाची पाल चुकचुकत होतीच.
पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, पोलिस उपअधीक्षक डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि. शिवाजी जायपत्रे, सपोफौ. जाधव, हवालदार माने, मंगरुळे, भोसले, मंडलीक, डोंगरे , नाईक लोहार, धिमधिमे, कॉ. घागरे, भराटे, फत्तेपुरे, सगरे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
दिलेल्या फिर्यादीबाबत पोलिसांनी सर्व शक्यतांचा तपास केला आणि आश्विनीची कसून चौकशी केल्यानंतर तिने गुन्हा कबूल केला. आश्विनीच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची माहिती तिच्या निकटवर्तीयांनाही झाली होती. मात्र तिला वाचविण्यासाठी पोलिसांच्या चौकशीत सर्वांनी आमची काही तक्रार नाही, असे पालुपद लावले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. सपोनि. जायपत्रे यांना गोपनीय बातमीदाराकडून याबाबत अचूक माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एका साक्षीदाराकडे केलेल्या चौकशीत आश्विनीनेच गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. मात्र गुन्ह्याचा उद्देश समजून येत नव्हता, अखेर आश्विनीला ताब्यात घेवून चौकशी केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली.
* दै. ‘सुराज्य’ने फिर्यादीबाबत वर्तवलेला अंदाज
या घटनेत चोरट्याने फक्त चार ग्रॅमचे दागिने म्हणजे सुमारे 20 हजाराचाच ऐवज चोरलेला आहे. इतक्या कमी ऐवजासाठी चोर निष्पाप बालकाचा खून करण्याच्या स्तरापर्यंत कसा काय गेला? यावेळी बाळाच्या आईने केलेला आरडाओरडा परिसरात कोणालाच कसा ऐकू आला नाही? पाळण्यातील बाळाकडून कसलाच अपाय अथवा आरडाओरडा होण्याचा संभव नसतानाही आणि त्यामुळे चोरी करण्यात कसलाच अडथळा येत नसतानाही चोरट्याने प्रथम बाळालाच कसे काय ठार मारले? घरात कोणी नसतानाही गेट कसे काय उघडे राहिले? श्वान परिसरातच कसे काय घुटमळले? याबाबत अंदाज वर्तवून प्रश्नांच्या उत्तरांचा पोलिस कसून शोध घेत असल्याचे म्हटले होते.