वेळापूर : माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील बचतगट व मायक्रो फायनान्स यांच्या कर्जवसुली व अर्वाच्च्य बोलण्याला वैतागून 15 कुटुंबातील सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इच्छामरणबाबत परवानगी मागणारे निवेदन दिले आहे.
या निवेदनामध्ये वेळापूर येथील सिकंदर कोरबू यांनी लॉकडाऊन व कोरोनामुळे अर्थव्यवस्था ढासळलेली आहे व अश्यातच बचतगट व मायक्रो फायनान्स यांचे प्रतिनिधी घरी येऊन कर्जवसुली साठी तगादा लावत असून अर्वाच्च भाषेत बोलत असल्याचे म्हंटले आहे. यामुळे कोरबू यांनी मुख्यमंत्र्यांकडे ७ सप्टेंबरपर्यंत आपण इच्छामरणची परवानगी द्यावी अन्यथा आपण परवानगी दिली, असे समजून महाराष्ट्रातील कोणत्याही तहसील कार्यालयासमोर आपण आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वेळापूर येथील अन्य १४ कुटुंबातील सदस्यांनी ही मुख्यमंत्री यांच्याकडे अशीच इच्छामरण बाबत परवानगी मागितली आहे. शासनाने एकतर सर्वसामान्य माणसांनी व महिलांनी घेतलेली बचतगट व मायक्रो फायनान्स यांची कर्ज माफ करावीत अन्यथा आम्हांला इच्छामरणास परवानगी द्यावी व आमचा मानसिक व आर्थिक छळ कमी करावा, अशी विनंती केली आहे.
हे निवेदन मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, तहसीलदार माळशिरस, प्रांताधिकारी अकलूज, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज त्याचसोबत आमदार राम सातपुते यांना दिले आहेत. आमदार राम सातपुते यांनी आज शुक्रवारी सदर कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन तणावात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका, आजच आपण मुख्यमंत्री यांना तातडीने पत्र देऊन या प्रकरणी आपण मार्ग काढुयात, असे आश्वासन दिले.
“सर्वसामान्य जनतेला सक्षम व आर्थिक दृष्टीने मदत करण्यासाठी महिला बचत गट व मायक्रो फायनान्स हे काम करीत असतात मात्र तालुक्यातील बचत गट व मायक्रो फायनान्स हे त्यांना मृत्यूच्या तोंडात ढकलणारे असून त्यांना जागतिक महामारी सुद्धा समजत नाही. त्यामुळे मी इच्छामरण ची मागणी केली आहे”
– सिकंदर कोरबू, वेळापूर