सोलापूर : न्यू पाच्छा पेठेतील कोंचीकोरवी गल्ली पोशम्मा मंदिराजवळील इमारतीमध्ये सुरू असलेल्या मटकावर गुन्हे शाखेने टाकलेल्या धाडीत आरोपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यात आतापर्यंत एकूण 288 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, आकाश कामाठी, स्टिफन स्वामीसह चौघांना आणखी तीन दिवस वाढीव कोठडी मिळाली आहे.
या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार नगरसेवक सुनील कामाठी हा अद्यापही फरारच आहे. त्याचा पुतण्या आकाशने दिलेल्या माहितीनुसार मटक्यातील प्रमुख 17 लाईनदार आणि त्यांचे एजंट मिळून आतापर्यंत 288 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामाठी याचा जेलरोड आणि एमआयडीसी या दोन्ही पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका व्यवसाय होता. त्यानुसार जेलरोडमधील 10 तर एमआयडीसीमधील 7 अशा 17 प्रमुख लाईनदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित एंजटांवर कारवाई करण्यात आली आहे.
यात मटका प्रकरणाची कसून तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 288 आरोपी झाले आहेत. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, असे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पोलिस कर्मचारी बडतर्फ
मटका प्रकरणात अटकेत असलेले पोलिस शिपाई स्टीफन नेल्सन स्वामी यांना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. मटका व्यवसायात भागीदारी असल्यामुळे त्यास अटक झाली होती. याबाबत पोलिस आयुक्तांनी अहवाल मागवला होता. अहवालानुसार काल शनिवारी त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.